कर्नाटकवाल्यानेच केला गोव्यात कर्नाटक टॅक्सीला विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 05:10 PM2023-10-30T17:10:45+5:302023-10-30T17:11:57+5:30
तारा केरकर यांनी कर्नाटकातील टॅक्सी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी वापरल्या जात असल्याने पत्रकार परिषद घेतली होती.
नारायण गावस -
पणजी : कर्नाटकातील पण गेल्या ४० वर्षांपासून गाेव्यात स्थायिक झालेल्या टॅक्सी चालकाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी कर्नाटकातून आणलेल्या टॅक्सीविराेधात नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने स्थानिक टॅक्सी चालकांना प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. नंतर बाहेरील लाेकांना संधी दिली पाहिजे, असे मूळचे कर्नाटकातील व गाेव्यात स्थायिक झालेले नागराज यांनी काल पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. तारा केरकर यांनी कर्नाटकातील टॅक्सी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी वापरल्या जात असल्याने पत्रकार परिषद घेतली होती.
यावेळी जवळपास ३०० कर्नाटकातील टॅक्सी खास राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गाेव्यात आणल्या आहेत. त्यामुळे स्थानिक टॅक्सीवाल्यांच्या व्यवसायाला फटका बसला आहे. आमचे गेली अनेक वर्षे गोव्यात स्थायिक असलेले कर्नाटकातील दोन हजार टॅक्सीचालक आहेत. पण या लोकांवर अन्याय झालेला आहे. त्यामुळे सरकारतर्फे स्थानिकांना प्रथम प्राधान्य द्यावे. मी मुळचा कर्नाटकातील असलाे तरी ४० वर्षांपासून गाेव्यात राहात आहे. आमचाही या कर्नाटकातील टॅक्सी गोव्यात भाड्यासाठी आणल्याने विरोध आहे, असेही नागराज यांनी सांगितले.
राष्ट्रीय स्पर्धेनिमित्त राज्यात देशभरातील प्रतिनिधी आले आहेत. त्यांना आणण्याची-पोहोचविण्याची साेय करण्यासाठी टॅक्सी लावण्यात आल्या आहेत. यात काही कर्नाटकातील टॅक्सींना हे कंत्राट दिल्याने आरजी तसेच अन्य राजकीय पक्षांनी याला विरोध केला आहे. हा स्थानिक टॅक्सी चालकांवर अन्याय असल्याचे सांगण्यात आले होते.