मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दुस-याकडे न सोपवणं चुकीचं- काँग्रेस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2018 09:36 PM2018-03-05T21:36:14+5:302018-03-05T21:36:14+5:30
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी उपचारासाठी राज्याबाहेर जाताना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी एखाद्या मंत्र्याकडे देण्याऐवजी मर्यादित अधिकार असलेली तीन मंत्र्यांची समिती नियुक्त करून घटनाबाह्य पद्धतीचा अवलंब केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी केला.
पणजी: मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी उपचारासाठी राज्याबाहेर जाताना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी एखाद्या मंत्र्याकडे देण्याऐवजी मर्यादित अधिकार असलेली तीन मंत्र्यांची समिती नियुक्त करून घटनाबाह्य पद्धतीचा अवलंब केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी केला. मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दुस-याकडे न सोपवून पर्रीकरांनी राज्याचं नुकसान केल्याचा आरोप शांताराम नाईक यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांचा आजार लवकर बरा व्हावा, असे आपल्यासह काँग्रेसलाही वाटते. परंतु त्यांच्या आजारामुळे राज्याचे आरोग्य बिघडू देता कामा नये. फायली अडून असल्यामुळे प्रशासन ठप्प झाले आहे. एका माणसाच्या आजारामुळे संपूर्ण राज्याला वेठीस धरले जात आहे हे बरोबर नसल्याचे त्यांनी सांगितले. दुस-या मंत्र्याकडे जबाबदारी देण्याऐवजी मंत्र्यांना ५० लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाचे प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार देणे, ५ कोटी रुपयांपर्यंतच्या खर्चाचे प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार तीन मंत्र्यांना देणे हे काय प्रकार चालले आहेत ? याला कोणता संविधानिक आधार आहे ? आणि ५ कोटी रुपये खर्चापेक्षा अधिक रकमेच्या प्रस्तावाचे काय? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
मुख्यमंत्र्यांचा आपल्या मंत्रिमंडळावर विश्वास नाही. खुद्द भाजपमधील मंत्र्यांवर आणि आमदारांवरही विश्वास नाही असाच त्याचा अर्थ होत असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप व घटक पक्षांच्या किमान समान कार्यक्रमाचे काय झाले त्याचा कुणी तरी खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी केली. माडाला राज्यवृक्षाचा दर्जा देण्याची एक गोष्ट सोडून या कार्यक्रमपत्रिकेवरील कोणतीच गोष्ट करण्यात आलेली नसल्याचे ते म्हणाले. किमान समान कार्यक्रमात दीनदयाळ उपाध्याय गोवा फॉरवर्डला कसे चालतात, असेही त्यांनी विचारले. आरोग्य विमा योजनेला सरकारने दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव दिले आहे.