"गोव्यात सरकारी नोकऱ्यांसाठी कोकणी भाषेचे ज्ञान अनिर्वाय करण्याची वेळ आलीय", विरोधी पक्षनेते युरी आलेमाव
By सूरज.नाईकपवार | Published: December 23, 2023 04:24 PM2023-12-23T16:24:18+5:302023-12-23T16:24:38+5:30
Goa News: गाेव्यात सरकारी नोकर भरतीसाठी भरती नियमांचे पुनरावलोकन करण्याची आणि कोकणी भाषेचे शैक्षणिक ज्ञान अनिवार्य करण्याची वेळ आली आहेअसे विराेधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले.
- सूरज नाईक-पवार
मडगाव - गाेव्यात सरकारी नोकर भरतीसाठी भरती नियमांचे पुनरावलोकन करण्याची आणि कोकणी भाषेचे शैक्षणिक ज्ञान अनिवार्य करण्याची वेळ आली आहेअसे विराेधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले.
आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहून शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञांना विश्वासात घेऊन या दिशेने प्रक्रिया सुरू करण्याची मागणी करणार आहे. सध्या अस्तित्वात असलेली अट गोव्याबाहेरील उमेदवारांना जुजबी कोंकणी ज्ञानाच्या आधारे सरकारी नोकऱ्या बळकावण्याची संधी देते. भविष्यात नीज गोंयकार सरकारी नोकरीपासून वंचित राहू शकतो, असा त्यांनी केला आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेल्या, काही अपवाद वगळता शासकीय भरतींमध्ये गट अ आणि गट ब पदांसाठी कोकणी भाषेचे ज्ञान आवश्यक केले जाईल, या घोषणेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सदर तरतुदी मागील सरकारने सुमारे ११ वर्षापूर्वीच अधिसूचित केल्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमध्ये नवीन काहीही नाही असे त्यांनी सांगितले.
सरकारी नोकर भरतीसाठी सरकारने कोकणी भाषेचे शैक्षणिक ज्ञान अनिवार्य केले पाहिजे जेणेकरुन विद्यार्थी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कोकणी शिकण्यास पूढे येतील. यामुळे आपली मातृभाषा जपण्यास मदत होईल आणि नीज गोंयकारांनाच सरकारी नोकऱ्याही मिळतील, असा दावा त्यांनी केला.
आपल्या पुढच्या पिढ्यांनी आपली मातृभाषा कोंकणी शिकावी यासाठी आपण दीर्घकालीन योजना तयार करणे आवश्यक आहे. स्थानिक भाषेचे ज्ञान सरकारी अधिकारी आणि लोकांमध्ये संपर्क निर्माण करण्यास देखील मदत करते. मला आशा आहे की सरकार माझ्या सूचनेचा सकारात्मक विचार करेल, असे त्यांनी म्हटले आहे.
नवीन शैक्षणिक धोरण (एनईपी) देखील मातृभाषेतील शिक्षणावर भर देते. कोकणी भाषेचे शैक्षणिक ज्ञान सक्तीचे केल्यास, राज्यात एनईपीच्या प्रभावी अंमलबजावणीलाही या निर्णयामुळे बळ मिळेल. सरकारने दीर्घकालीन दृष्टीकोनातून संपूर्ण भरती प्रक्रियेचे पुनरावलोकन करणे आवश्यक आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.
राज्याच्या लोकसंख्येमध्ये झपाट्याने बदल होत आहेत. गोव्यात राहणारा कोणीही बाहेरील व्यक्ती दोन महिन्यांच्या कालावधीत साध्या संभाषणासाठी कोकणी भाषेचे व्यवहार्य ज्ञान मिळवू शकतो कारण कोकणी ही शिकण्यासाठी तुलनेने सोपी भाषा आहे. हिंदी किंवा मराठी भाषिक व्यक्ती शाळांमध्ये कोंकणी न शिकता अल्पावधीतच कोंकणी भाषेतील लेखन आणि बोलण्याचे कौशल्य आत्मसात करु शकतात, असेही त्यांनी नमूद केले.