जॅक सिकेरांची स्मृती सरकारला जपावी लागेल : सुदिन
By admin | Published: May 22, 2015 02:31 AM2015-05-22T02:31:04+5:302015-05-22T02:33:45+5:30
पणजी : जनमत कौलावेळी डॉ. जॅक सिकेरा यांनी दिलेले योगदान हे मोठे आहे. नव्या पिढीला त्यांचे योगदान कळावे म्हणून सरकारने त्यांची स्मृती जपावी लागेल
पणजी : जनमत कौलावेळी डॉ. जॅक सिकेरा यांनी दिलेले योगदान हे मोठे आहे. नव्या पिढीला त्यांचे योगदान कळावे म्हणून सरकारने त्यांची स्मृती जपावी लागेल. त्यासाठी एखादे वस्तुसंग्रहालयही उभारण्याचा विचार करावा, असे मत म.गो. पक्षाचे प्रमुख नेते आणि बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.
गोवा विधानसभेसमोर सिक्वेरा यांचा पुतळा उभा करावा, अशी मागणी दक्षिण गोव्यातील काही घटकांकडून सध्या केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्री ढवळीकर यांना ैैै‘लोकमत’ने गुरुवारी विचारले असता, ते म्हणाले की गोव्याच्या सीमेवर किंवा राज्यातील एखाद्या शहरात मोठी बाग सरकारने उभी करावी किंवा वस्तुसंग्रहालय उभे करावे व त्यात सिकेरा यांच्यासह ज्या ज्या नेत्यांनी व व्यक्तींनी जनमत कौलावेळी महत्त्वाचे योगदान दिले आहे, त्या सर्वांबाबतची माहिती उपलब्ध करावी. नव्या पिढीला आणि गोव्यात येणाऱ्या पर्यटकांनाही ही माहिती कळावी. सचित्र अशी आणि पुराव्यांसह माहिती उपलब्ध केल्यास तो ज्ञानाचा मोठा खजिना ठरेल.
मंत्री ढवळीकर म्हणाले, की केवळ विधानसभेसमोर पुतळा उभारावा एवढा मर्यादित विचार मी करत नाही. विधानसभेतील मंत्री-आमदारांना सिकेरा यांचे योगदान ठाऊक आहे. गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व राखण्यासाठी सिकेरा यांनी मोलाची कामगिरी केली आहे. त्यांच्यासह इतरांनीही जे योगदान दिले ते सारे नव्या पिढीसमोर असावे व त्यासाठी वस्तुसंग्रहालय किंवा एखाद्या मोठ्या जागेत सिकेरा यांच्या नावे बाग उभी करता येईल.
(खास प्रतिनिधी)