सरकारला जॅकपॉट, कॅसिनोंनी दिले १,५६७ कोटी! एका वर्षात तब्बल ६६९ कोटी महसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2024 12:31 PM2024-07-26T12:31:26+5:302024-07-26T12:32:49+5:30
मुख्यमंत्र्यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राज्य सरकारला २०२३- २४ या आर्थिक वर्षात कॅसिनो परवाना नूतनीकरणातून दुप्पट महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षी सरकारला पाण्यातील तसेच पाण्याबाहेरील विविध कॅसिनोंच्या परवाना नूतनीकरणातून ६६९ कोटी ६३ लाख ११ हजार २८२ रुपये एवढी मोठी रक्कम मिळाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अधिवेशनात लेखी स्वरुपात दिली आहे. आमदार वीरेश बोरकर यांनी हा लेखी प्रश्न मांडला होता.
राज्यात सध्या कसिनोंची संख्या वाढत आहे. त्यामुळे यातून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत आहे. कॅसिनोमध्ये मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी उद्योजक खेळायला येत असतात, त्यामुळे मांडवीतील कॅसिनो असो किंवा इतर विविध तारांकित हॉटेलमधील कॅसिनो असो सरकारला महसूल मात्र कोटींच्या घरात मिळत आहे. त्यामुळे कॅसिनोना कितीही विरोध झाला म्हणून मांडवीतील कॅसिनो सरकार बंद करू शकत नाही. कारण मोठ्या प्रमाणात महसूल हा या कॅसिनोतून मिळत आहे.
'ती' रक्कम अर्थसंकल्पाएवढी
राज्य सरकारला २०१९-२०२० ते २०२३-२४ या पाच वर्षात तब्बल १५६७ कोटी ६४ लाख ३६ हजार ४६७ एवढी रक्कम कसिनो परवाना नूतनीकरणातून मिळाली आहे. ही रक्कम म्हणजे सरकारच्या एका मोठ्या खात्याचा पूर्ण वर्षाचा अर्थसंकल्प आहे. २०१९-२० ते २०२२-२३ या चार वर्षात महसूल कमी होता. पण २०२३-२४ मध्ये यात दुप्पट वाढ झाली आहे. गेल्या चार वर्षात जेवढा महसूल मिळाला होता तेवढा महसूल गेल्या एका वर्षात सरकारला मिळाला आहे.