जनसंघाचे नेते जोगळेकरांचे निधन, लोकमतच्या गोवा आवृत्तीचे होते स्तंभलेखक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 08:25 PM2017-08-21T20:25:15+5:302017-08-21T20:25:40+5:30
जनसंघाचे माजी कार्यकर्ते आणि गोव्यातील भारतीय जनता पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले रघुनाथ विनायक जोगळेकर (89) यांचे सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास निधन झाले.
मडगाव : जनसंघाचे माजी कार्यकर्ते आणि गोव्यातील भारतीय जनता पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले रघुनाथ विनायक जोगळेकर (89) यांचे सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास निधन झाले. सोमवारी सायंकाळी मडगावच्या मठग्रामस्थ हिंदुसभेच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गोव्यातील शिक्षण क्षेत्राशी तसेच क्रीडा क्षेत्राशी त्यांचा जवळचा संबंध होता. ‘दै. लोकमत’च्या गोवा आवृत्तीचे ते लोकप्रिय स्तंभलेखक होते. त्यांच्या मागे पत्नी उषा, पुत्र संजय व सुमंत असा परिवार आहे. काही दिवस त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना इस्पितळात दाखल केले होते. त्यानंतर त्यांना घरी आणले होते.
पुण्यातून मडगावात स्थायिक झालेले जोगळेकर ‘र. वि. जोगळेकर’ या नावानेच सगळीकडे प्रसिध्द होते. केरी-फोंडा येथील दादा वैद्य विद्यालय आणि मडगावच्या दामोदर विद्यालयाचे ते प्राचार्य होते. या विद्यालयांत शिकवितानाच त्यांनी गोव्यात कबड्डी, खो-खो, मल्लखांब, सूर्यनमस्कार या देशी खेळांचा प्रसार करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. गोवा कबड्डी संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. लेझीमसारखा खेळही त्यांनी गोव्यात लोकप्रिय केला होता. त्याशिवाय गोव्यात संस्कृत भाषेचा प्रसार व्हावा यासाठी मडगावातील संस्कृत प्रचारिणी या संस्थेमार्फत विद्याथ्र्यासाठी त्यांनी खास संस्कृत वर्गाचे आयोजन केले होते. त्यांच्या हाताखाली कित्येक संस्कृत शिक्षक तयार झाले.
जनसंघाशी संबंधित असलेल्या जोगळेकर यांनी आणीबाणीच्यावेळी प्रशासनाला विरोध केल्याने त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. आणीबाणीनंतर देशात स्थापन झालेल्या जनता पक्षाशीही त्यांचा संबंध आला. जनसंघाचे रूपांतर भारतीय जनता पक्षात झाल्यानंतर गोव्यात या पक्षाची पाळेमुळे रुजविण्यासाठी त्यांनी मोलाचे काम केले. रामभाऊ म्हाळगी यासारख्या संघाच्या नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते. मात्र, नंतर राममंदिराच्या प्रश्नावर त्यांनी भाजपच्या भूमिकेला विरोध करत या पक्षापासून फारकत घेतली. त्यानंतर ते कोणत्याही राजकीय पक्षासोबत सक्रिय नव्हते.