जनता दरबार ठरतोय हितकारक; मुख्यमंत्र्यांच्या लोकसंपर्कातून विकासाला चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2025 07:52 IST2025-01-01T07:52:02+5:302025-01-01T07:52:50+5:30
प्रश्नांचे निराकरण

जनता दरबार ठरतोय हितकारक; मुख्यमंत्र्यांच्या लोकसंपर्कातून विकासाला चालना
विशांत वझे, लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्र्यांची पाच वर्षांची वाटचाल पूर्ण करून पुढील वाटचाल अतिशय नियोजनबद्ध व्हावी, यासाठी सातत्याने सर्वच बाबतीत सुवर्णमध्य साधत दिलेले योगदान महत्त्वपूर्ण म्हणायला हवे. त्यांचा जनता दरबार हा दिवसेंदिवस लोकप्रिय, तसेच समस्या निवारण दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे. लोकांचे प्रश्न तातडीने सोडवण्यात मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबाराला मोठे यश आले आहे.
सतत जनतेचा संपर्कात राहणारा मुख्यमंत्री अशी ख्याती त्यांनी प्राप्त केली आहे. दररोज सकाळी तासभर ते लोकांना भेटतात. त्या व्यतिरिक्त दर शनिवार, रविवार रवींद्र भवनात लोकांना नियमित भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. यादरम्यान लोकांची मोठी गर्दी असते. लोकसंपर्कातून लोकांचे प्रश्न समजून येतात, तसेच बऱ्याच वेळा तत्काळ प्रश्न सोडवण्याची किमया मुख्यमंत्री साधत आलेले आहेत. लोकही यामुळे समाधानी आहेत.
लोकांचे अनेक तन्हेचे प्रश्न असतात. वेगवेगळ्या समस्या समजून घेत मुख्यमंत्री यावर तोडगा काढतील, अशा प्रकारचा विश्वास जनतेत वृद्धिंगत झाल्याने दरबाराला मोठी गर्दी होत असते. तातडीने लोकांचे प्रश्न सोडवणे यावर मुख्यमंत्री भर देत असतात. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. रोजगार, सामाजिक प्रश्न, घरगुती प्रश्न, बदली व इतर समस्या व प्रश्नांबरोबरच अगदी विवाह जुळवणी व इतर प्रश्नही लोक घेऊन येतात, असे जनता दरबारात दिसून आलेले आहेत.
मुख्यमंत्री किती व्यस्त असले, तरी लोकांना भेटल्याशिवाय जात नाही. त्यामुळे लोकांना पूर्ण विश्वास बसलेला असून बहुतेक प्रश्नांना सातत्याने मार्ग काढण्यात जनता दरबाराच्या माध्यमातून यश मिळाल्याने एक प्रकारे जनता दरबार लोकप्रिय ठरलेला आहे.
नववर्षानिमित्त शुभेच्छा
लोकांना आपल्या प्रश्नाचे निराकरण होणे गरजेचे असते. त्यामुळेच ते लोक आपल्याकडे वेगवेगळे प्रश्न घेऊन येत असतात. जनता दरबाराच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा होत असल्याने, तसेच तातडीने वेगवेगळे अर्ज निकालात काढण्यात येत असल्याने निश्चितपणे लोकांचा विश्वास वाढत चाललेला आहे. लोकसंपर्कात राहणे मला खूप आवडते. त्यातून स्नेहभावही वाढतो व लोकांचे प्रश्नही समजून येत असतात. त्यामुळेच आपण व्यस्त वेळातही लोकांना भेटतो. तसेच जनता दरबारात राज्याच्या कानाकोपऱ्यांतून लोक मला भेटायला येत असतात. लोकांनी यापुढेही आपले प्रश्न माझ्यासमोर मांडावेत. त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न सातत्याने करीत राहीन. नववर्षानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.