जान्हवी कपूरने आणली इफ्फीत जान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 08:09 PM2018-11-22T20:09:49+5:302018-11-22T20:09:52+5:30
निरस, रटाळपणे सुरु झालेल्या ४९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज युवा रसिकांची धडकन जान्हवी कपूरने जान आणली.
- संदीप आडनाईक
पणजी : निरस, रटाळपणे सुरु झालेल्या ४९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज युवा रसिकांची धडकन जान्हवी कपूरने जान आणली. गेल्या दोन दिवसापासून इफ्फीत युवा सिनेरसिकांना कोणते कलाकार येणार याची उत्सुकता लागून राहिली होती, ती जान्हवी कपूरने भरुन काढली. कर्न्व्हसेशन वुईथ कपूर्स हा कला अकादमीत झालेल्या मास्टर क्लासमध्ये बापबेटींची मुलाखत घेतली. यासाठी बोनी कपूर, जान्हवी कपूर आणि अर्जुन कपूर उपस्थित राहणार होते. मात्र नव्या चित्रपटातील व्यक्तिरेखा जाहीर होउ नये यामुळे अर्जुन कपूर उपस्थित राहिले नाहीत. त्याबद्दल बोनी कपूर यांनी दिलगिरी व्यक्त केली.
इफ्फी स्थळावर जान्हवी कपूर येताच प्रतिनिधींनी विशेषत: युवा प्रतिनिधींनी जल्लोष करुन तिचे स्वागत केले. कला अकादमीच्या रेड कार्पेटवर बोनी कपूरसोबत आलेल्या जान्हवीने धडक चित्रपटातील गाण्याच्या पार्श्वभूमीवर चाहत्यांच्या गर्दीत कार्यक्रम स्थळी प्रवेश केला. जान्हवीने साऱ्याच युवा प्रतिनिधींंची मने जिंकली. तिच्यासोबत सेल्फी, फोटो काढण्यासाठी सर्वांनीच गर्दी केली होती.
प्रश्नोत्तराच्या वेळीही जान्हवीने नव्या जुन्या पिढीतील कलाकारांचा आदर करत संयमित उत्तरे दिली.
*बच्ची थी,
फिर एक दिन अचानक ममा को खो दिया
मां की आवाज में बात करती हूं
इसी जरीए मै उनको अपनी पास रखती हूं*
आई श्रीदेवीच्या आठवणीने काहीशी गहिवरलेल्या जान्हवीने तिच्यावरील कविता सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळविली. आवडत्या नायिकेमध्ये मीनाकुमारी, वहिदा रेहमान, रेखा, नूतन, मधुबाला यासारख्या कलावंतांची नावे घेतली तर नायकांमध्ये दिलिपकुमार, गुरुदत्त यांचे नाव घेतले. अलिकडच्या चित्रपटांसोबत सुजाता, बंदिनी, सीता और गीता, मदर इंडिया या चित्रपटांचा उल्लेख केला. दिग्दर्शक निर्माता राहुल रवैल यांनीही तिचे याबद्दल कौतुक केले.
केवळ एकच चित्रपट नावावर असलेल्या जान्हवीने आईप्रमाणेच मल्याळम, कन्नड आदि भाषांमध्येही काम करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगून कामाप्रती निष्ठा असल्याचे दाखवून दिले. नव्या पिढीने जुन्याकडून काय घेतले, अशा प्रश्नावर तिने संयमितपणे जुन्या काळातील कलाकारांचा अभिनय, कामाप्रती निष्ठा, पूर्वीच्या चित्रपटातील कथानक यांचा आवर्जुन उल्लेख केला. मिस्टर अॅन्ड मिसेस ५५ या गुरुदत्त यांच्या चित्रपटाचा दाखला देउन हा चित्रपट कथेच्या दृष्टीने आणि अभिनयाच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट असल्याचे तिने सांगितले.