समुद्रात ५१ किमी पोहण्यासाठी जयंत दुबळे सज्ज; फिट इंडिया चळवळीचा देणार संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 06:03 PM2021-02-03T18:03:31+5:302021-02-03T18:10:06+5:30

शापाेरा, झुआरी, मांडवी नदी करणार पार

Jayant Lean ready to swim 51 km in the sea; The message of the Fit India movement | समुद्रात ५१ किमी पोहण्यासाठी जयंत दुबळे सज्ज; फिट इंडिया चळवळीचा देणार संदेश

समुद्रात ५१ किमी पोहण्यासाठी जयंत दुबळे सज्ज; फिट इंडिया चळवळीचा देणार संदेश

Next

-सचिन कोरडे

पणजी : नागपूर (महाराष्ट्र) येथील जयंत जयप्रकाश दुबळे हा १८ वर्षीय जलतरणपटू गोव्याच्या समुद्रात ५१ किमीचा पल्ला गाठणार आहे. ४ आणि ७ फेब्रुवारी रोजी ही मोहीम असेल. आपण या मोहिमेसाठी सज्ज असून, गोव्याच्या स्वच्छ पाण्यात पोहण्याची उत्सुकता लागली असल्याचे त्याने पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी जयंतचे वडील जयप्रकाश दुबळे, आई, निरीक्षक सुबोध सुळे आणि लक्ष्मी परब उपस्थित होत्या.

जेडी स्पोर्ट्स युथ क्लबचा अध्यक्ष असलेला जयंत हा राष्ट्रीय मॅरेथाॅन सी स्विमर आहे. त्याने यापूर्वी इंडिया बुक रेकाॅर्डही नोंदवला आहे. ४ रोजी शापोर ते आग्वाद किल्ला (२४ किमी) आणि७ रोजी झुआरी पूल ते मांडवी पूल असे २७ किमीचे अंतर पोहून पार करणार आहे. अरेबियन समुद्रात या मार्गावर पोहणारा जयंत हा पहिला जलतरणपटू ठरणार आहे.

जयंत म्हणाला, की २०१६मध्ये मी गोव्याच्या समुद्रात पोहलो होतो. तेव्हापासून गोव्यात पोहण्याची इच्छा होती. येथील पाणी स्वच्छ आहे. त्यामुळे पोहण्याचा आनंद वेगळाच असतो. यावेळी अंतर वाढविण्यात आले असून, हे आव्हान पेलण्यासाठी मी सज्ज आहे.

जयंतचे वडील जयप्रकाश दुबळे म्हणाले की, ‘ओपन सी वाॅटर’मध्ये सहभागींची संख्या वाढावी, इतरांना प्रेरणा मिळावी, यासाठी ही मोहीम जेडी स्पोर्ट्स युथ फाउंडेशनने राबविली आहे. यासाठी आम्हाला कॅप्टन ऑफ पोर्ट व गोवा सरकारच्या विविध खात्यांनी मदत केली आहे.

‘फिट इंडिया’साठी

कोरोनामुळे लोक आरोग्याप्रती अधिक जागरूक झाले आहेत. शारीरिक आणि मानसिकरित्या फिट राहण्यासाठी कुठला तरी खेळ अंगीकारणे महत्त्वाचे आहे. या मोहिमेतून मला ‘फिट इंडिया’चा नारा द्यायचा आहे. समुद्रात पोहणे हे अत्यंत आव्हानात्मक आहे. जेव्हा तुम्ही पूर्णपणे फिट असता तेव्हाच हे आव्हान पेलू शकता. मी वयाच्या ५व्या वर्षापासून पोहत आहे. अनेक राष्ट्रीय स्पर्धांतही पोहलो आहे. कुठल्याही खेळ स्वीकारला तर तुम्ही फिट राहू शकता, हेच मला यातून सांगायचे आहे, असे जयंत दुबळे याने सांगितले.

बुडणाऱ्यांची संख्या वाढतेय...

गोव्याला सुंदर समुद्र लाभला आहे. मात्र येथे बुडणाऱ्यांची संख्याही कमी नाही. देशातील बुडून मृत्यू होण्याचे प्रमाणही अधिक आहे. राष्ट्रीय क्राईम रेकाॅर्ड ब्युरोनुसार, २०१८च्या अहवालात प्रत्येक दिवशी देशात ८३ लोक बुडून मरतात. ही आकडेवारी कमी करायची असेल तर ‘वाॅटर सेफ्टी’चे पालन करायला हवे. याबाबत जागृती करण्याची गरज आहे. अशा जलतरण मोहिमेतून मला हाच संदेश द्यायचा आहे, असेही जयंत दुबळेने सांगितले.

Web Title: Jayant Lean ready to swim 51 km in the sea; The message of the Fit India movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.