सावत्र मत्सर व पैशाची चणचण: प्रियकरांसवमेत डाव रचून मुलांना आणून मडगावात सोडले
By सूरज.नाईकपवार | Published: February 3, 2024 04:48 PM2024-02-03T16:48:36+5:302024-02-03T16:49:22+5:30
संशयित जेरबंद.
सूरज नाईकपवार, मडगाव: मडगावात सापडलेल्या त्या दोन अल्पवयीन मुलांना सावत्र मत्सर व पैशाच्या चणचणीमुळे त्या सावत्र आईने आपल्या प्रियकरासमवेत डाव रचून आणून सोडले होते असे आता उघड झाले आहे. याप्रकरणी मडगाव पोलिसांनी शेजारच्या महाराष्ट्रातील सावंतवाडी येथे रेल्वे स्थानकावर या दोघांही संशयितांच्या मुसक्या आवळल्या. निकी पांडे (३६) व अनिकेत राजगुरु (३८) अशी त्यांची नावे आहेत. रेल्वेतून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांच्या हाती बेडया ठोकल्या. सीसीटिव्ही कॅमेरा व मोबाईल लोकेशच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना शेवटी संशयितांना गाठले.
२७ फेब्रुवारी रोजी शहरातील गांधी मार्केट येथे एक तीन वर्षीय बालिका सापडली होती. तर त्याच दिवशी येथील कोकण रेल्वे स्थानकावर एक दोन वर्षीय बालक सापडला होता. रेल्वे स्थानकाच्या सीसीटिव्ही कॅमेरामध्ये नेत्रावती एक्सप्रेस रेल्वेतून एक महिला व एक पुरुष त्यांना घेउन रेल्वेतून खाली उतरल्याची छबी टिपली गेली होती.
नंतर त्या मुलांची आई अंजली ही आपल्या मुलांच्या शोधासाठी मडगावात आली होती. योगायोगाने ती रेल्वे पोलिसांना सापडली. त्यानंतर एकंदर घटनेचा उलगडा पोलिसांना झाला होता.नंतर मडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक विश्वजीत ढवळीकर यांनी तपासकामाला प्रारंभ केला. पोलिस पथकही नेमण्यात आले. संशयित सावंतवाडी येथे असल्याची पक्की माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी पोलिसांनी तेथे जाउन संशयितांना ताब्यात घेउन नंतर रितसर अटक केली.