चलो गोवा! ‘जीवाचा गोवा’ हंगामाला आजपासून प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 06:32 AM2018-10-04T06:32:27+5:302018-10-04T06:32:59+5:30
रशियाहून आले पहिले चार्टर विमान : या महिन्यात येतील ८५०० परदेशी पाहुणे
पणजी-वास्को : गोव्याच्या पर्यटन हंगामाला उद्या, गुरुवारपासून सुरुवात होत असून, पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास या वर्षाचे पहिले विदेशी चार्टर विमान ५२२ विदेशी पर्यटकांना घेऊन दाबोळी विमानतळावर दाखल होईल. ‘रोशिया एअरलाइन्स’चे ७४७ जम्बो चार्टर विमान मॉस्कोहून येणार आहे. या महिनाअखेरीस १७ चार्टर विमानांतून ८,५०० विदेशी पर्यटक ‘जीवाचा गोवा’ करण्यासाठी येतील.
या पर्यटकांचे विमानतळावर शानदार स्वागत केले जाते. कोनकोर्ड कंपनी रोशिया एअरलाइन्स चार्टर विमानाच्या प्रवाशांना गोव्यात सुविधा देते. दाबोळी विमानतळाचे संचालक बी.सी.एच. नेगी यांनी सांगितले की, ‘रोशिया एअरलाइन्स’ व ‘रॉयल एअरलाइन्स’ या कंपन्या रशियन पर्यटकांना घेऊन गोव्यात येतात. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेलगत गोव्यातील पेडणे तालुका आहे. या तालुक्यातील समुद्रकिनारे रशियन पर्यटकांना जास्त आवडतात. येथील मोरजीसारख्या किनाऱ्यांना तर ‘मिनी रशिया’ असे म्हटले जाते. या गावात रात्री दिवाळीसारखा लखलखाट असतो. खा-प्या-मजा करा, असा संगीतमय माहोल असतो. खरेदी-विक्रीच्या छोट्या-छोट्या स्टॉलवरही रशियनच असतात. खरेदी करणारे आणि विक्री करणारे दोघेही तेच. आॅम्लेटची गाडी चालविणाराही रशियन असतो. रशियन भाषेतील फलकच झळकतात. वेटरपासून मालकांपर्यंत सबकुछ रशियन. जागा खरेदीसाठी कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी काहींनी स्थानिक मुलींशी विवाह केला आहे.