कोविडचा जेएन १ व्हेरिएंट गोव्यात दाखल; तब्बल १९ जण बाधित आढळले
By वासुदेव.पागी | Published: December 20, 2023 01:33 PM2023-12-20T13:33:50+5:302023-12-20T13:34:36+5:30
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यात कोविडच्या केसेस वाढू लागल्याची वस्तुस्थिती मान्य करतानाच लोकांना घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सांगितले.
पणजी: देशात नव्याने आढळलेला कोविडचा जेएन व्हेरिएंट गोव्यातही पोहोचला आहे. गोव्यात आतापर्यंत ह्या व्हायरसचे १९ बाधित आढळल्याची माहिती आरोग्य खात्याकडून देण्यात आली आहे.
गोव्यात कोविड चाचण्यांबरोबरच जीनोम सिक्वेन्सिंगही सुरू करण्यात आल्यामुळे कोविडची प्रकरणे वाढल्यानंतर पुन्हा एकदा जिनोमिंग सिक्वेस्सिंगसाठीही सेम्पल्स पाठविणे सुरू केले होते. उत्तर गोवा जिल्हा इस्पितळातील जिनोमिंग विभागाने आरोग्य संचानलालयाला पाठविलेल्या अहवालानुसार जेएन १ चे १९ बाधित सापडले आहेत. यामुळे खळबळही माजली आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यात कोविडच्या केसेस वाढू लागल्याची वस्तुस्थिती मान्य करतानाच लोकांना घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सांगितले. लोकांनी केवळ काळजी घ्यावी. आरोग्य यंत्रणे स्ज ठेवण्यात आली आहेत. तसेच केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यांना आवश्यक सूचना केल्या असून या बैठकीत गोव्याचे आरोग्यमंत्री विशवजित राणे सहभागी झाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
केंद्रीय मंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाल्यानंतर आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी एक व्हिडिओ जारी केला असून त्यात त्यानी बैठकीत केंद्रीय मंत्र्यांकडून करण्यात आलेल्या सूचनांची माहती दिली. तूर्त कोणतीही मार्गदर्शिका केंद्राने जारी केली नसल्याचे राणे यांनी सांगितले परंतु खबरदारी घेणे आणि आरोग्य यंत्रणे सज्ज ठेवणे याकडे लक्ष दिल्याचे सांगितले.
काय आहे जेएन-१?
जेएन-१ हा करोना विषाणूच्या बीए.२.८६ या उपप्रकाराचाच एक भाग असून सप्टेंबर महिन्यात अमेरिकेत जेएन-१ या उपप्रकाराचा संसर्ग आढळून आला होता. जगात हा उपप्रकार २०२३ सालाच्या जानेवारी महिन्यातच आढळला होता. ज्या चीनमध्ये कोविड विषाणू तयार होऊन जगभर पसरला त्याच चीनमध्ये ही नवीन प्रजाती तयार झाल्याचेही शास्त्रज्ञांचे मत आहे. या व्हेरियन्टचे खास असे वेगळे लक्षण नाही आहे. ओमायक्रॉन व्हेरियन्टपासून जे त्रास होतात त्याच प्रकारचे त्रास या व्हेरिएंटपासून होवू शकतात.