नोकऱ्या विक्री आरोपाने सरकार हादरले; बाबूशच्या राजीनाम्याची काँग्रेसकडून मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2024 01:17 PM2024-09-12T13:17:31+5:302024-09-12T13:18:45+5:30

पक्षश्रेष्ठींकडून दखल : चौकशीसाठी विरोधकांचा दबाव

job selling allegations shakes state government congress demands babush monserrate resignation | नोकऱ्या विक्री आरोपाने सरकार हादरले; बाबूशच्या राजीनाम्याची काँग्रेसकडून मागणी

नोकऱ्या विक्री आरोपाने सरकार हादरले; बाबूशच्या राजीनाम्याची काँग्रेसकडून मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात कारकून पदाच्या भरतीवेळी नोकऱ्यांची विक्री केल्याचा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी केल्यानंतर सरकार हादरले आहे. भाजपच्या आतिल गोटातही याबाबत चर्चा सुरू झाली आहे. आमदार सरदेसाई यांनी केलेल्या आरोपाची चौकशी व्हायला हवी, असा आग्रह सर्व विरोधी पक्षांनी धरला आहे. नोकर भरतीबाबत अधूनमधून लाचखोरीचे आरोप होऊ लागल्याने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेही दिल्लीहून दखल घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नोकरभरती प्रकरणात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अजून आपली भूमिका जाहीरपणे मांडलेली नाही. पण त्यांचे स्थितीवर लक्ष आहे, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे माहिती मागितली असल्याचे कळते. महसूल खात्याबाबत चाललेल्या चर्चेची माहिती गोव्याहून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वापर्यंत काहीजणांनी पोहचवली आहे. आरोपांची चौकशी मुख्यमंत्री करून घेतील काय? अशी विचारणा काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांनी केली आहे. त्यासाठी अगोदर मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी मंत्रीपद सोडावे, अशीही मागणी चोडणकर यांनी केली आहे.

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पूत्र उत्पल पर्रीकर यांनीही चौकशीची मागणी केली आहे. महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांचे कार्यालय कोण चालवतो हे सर्वांना ठाऊक आहे, असे उत्पल पर्रीकर यांनी म्हटले आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात एलडीसीच्या नोकऱ्या विकल्या गेल्या, असे सरदेसाई यांनी म्हटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अजून त्यावर काहीही भाष्य केलेले नाही. कदाचित मुख्यमंत्री सावंत हे या आरोपाची चौकशी करून घेतील, असे काही मंत्री व काही आमदारांनाही वाटते.

भाजपमध्येही या प्रकरणाची आता जोरदार चर्चा सुरू आहे. सरकारवर वारंवार नोकऱ्या विक्रीचा आरोप होऊ लागल्याने भाजपमध्ये हा चिंतेचा विषय बनला आहे. एकेकाळी अशा प्रकारचे आरोप है काँग्रेस सरकारवर होत होते. त्यावेळी आंदोलने करण्यात भाजप पुढे असायचा पण मध्यंतरी सार्वजनिक बांधकाम खात्यात जे काही घडले त्यावरून लोकांना सगळी कल्पना आली. यापूर्वीच्या भाजप सरकारमध्ये दिपक प्रभू पाऊसकर मंत्री होते तेव्हाही नोकर भरतीत भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता. नीलेश काब्राल मंत्रीपदी असतानाही आरोप झाला व आताही आरोप होत आहे. नोकऱ्या खरोखर विकल्या गेल्या तर गुणी उमेदवारांवर अन्याय होतो. कधी पोलीस, कधी पंचायत, कधी आरटीओ खात्यात तर कधी बांधकाम खात्यातील भरती हा वादाचा विषय ठरत आली आहे.

त्या महिलेबाबत सर्वत्र चर्चा

दरम्यान, सरदेसाई यांनी ज्या महिलेचा उल्लेख केला आहे, त्या महिलेविषयी अनेकजण पूर्वीही चर्चा करायचे पण नोकर भरतीत तिचा हस्तक्षेप होतोय, असे बोलत नव्हते. मात्र तिच्या पराक्रमांविषयी अनेकदा विविध गोष्टी बोलल्या जातात. कोणतेही काम करून घेण्यासाठी तिच्याकडेच जावे लागते, असे अनेकजण तिसवाडीतही बोलतात. काही बिल्डरही बोलतात. त्यामुळे ही महिला नेमकी कोण व ती आली तरी कुठून आणि तिला आशीर्वाद कुणाचा आहे याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करून घेण्याची गरज आहे, अशी चर्चा मिरामार, ताळगाव, भाटलेसह तिसवाडीच्या भागात सुरू आहे. ही महिला म्हणजे कोणी आमदार नव्हे, पण ती एखाद्या आमदारापेक्षा जास्त वजनदार झाल्याची चर्चा अगदी पर्वरीत मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे.

ही भरती तात्काळ रद्द करा : विजय सरदेसाई

लाचखोरीमुळे कलंकित झालेली कनिष्ठ कारकून पदांची भरती प्रक्रिया तत्काळ रद्द करण्याची मागणी गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी केली आहे. या भरतीवर सरदेसाई यांनीच शंका उपस्थित करून त्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही केला आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया आता संशयाच्या भोवऱ्यात आल्यामुळे ती रद्द करणेच योग्य ठरणार असल्याचे सरदेसाई यांनी म्हटले आहे. तसेच गुणवत्तेच्या आधारावरच उमेदवार निवडावेत, अशी मागणी महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याकडे केली आहे. खुद्द मोन्सेरात यांनीच अडीच वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्यातील भरतीत पदे विकल्याचा आरोप करून ती रह करून घेतली होती, याची आठवणही त्यांनी करून दिली.

चौकशी व्हावी... 

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ कारकून भरती प्रकरणात पैशांचा व्यवहार झाल्याचा आरोप विजय सरदेसाई यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हायलाच पाहिजे. या प्रकरणात कुणाचा हात आहे हे काही लपून राहिलेले नाही, असेही उत्पल पर्रीकर यांनी म्हटले आहे. 

भाजप सरकार राज्यातील तरुणांच्या भवितव्याशी खेळत आहे. . विविध पदांसाठी जाहिराती दिल्या जातात. मात्र ही पदे आधीच पैसे घेऊन भरली जात आहेत याची चौकशी करण्याची मागणी आपचे नेते अमित पालेकर यांनीही केली आहे.

बाबूश यांचे कार्यालय कोण चालवते हे सर्वांना महिती : उत्पल

महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकणे हे भाजपसाठी खूप गरजेची आहे, कारण बाबूश यांच्यामुळे भाजप बदनाम होत आहे. बाबूश यांचे कार्यालय सध्या कोण चालवित आहे हे सर्वांना ठाऊक आहे. कुठलेही काम असल्यास 'आस्क देंट लेडी असे ते सर्वांना सांगतात. बाबूश यांच्यामुळेच भाजपात नकारात्मकता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांनाही याची पुरेपूर माहिती आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणे पक्षासाठी गरजेचे बनले आहे.

मंत्र्याना त्वरित हटवा : गिरीश चोडणकर 

कनिष्ठ कारकून भरती प्रक्रियेत आपला कोणताही संबंध नसल्याचे महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी केलेला खुलासा हा विश्वासपात्र नसल्याचे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे. कारण मोन्सेरात यांची मंत्रीपदाची कारकीर्द डागाळलेलीच राहिली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यापूर्वी ते नगर नियोजन खात्याचे मंत्री असतानाही त्यांनी भूरुपांतरणाचा घोटाळा केला होता, असेही चोडणकर यांनी म्हटले आहे.

तरुणांच्या भवितव्याशी खेळ : अमित पाटकर

कोणाला किती एलडीसी पदांचे वाटप केले गेले? कोणाच्या विनंत्या नाकारल्या गेल्या? ७ पदांच्या मागणीचे गूढ काय? मिशन टोटल कमिशनचे भागीदार कोण आहेत? निवृत्त न्यायाधीशांच्या अधिपत्याखाली प्रत्येक प्रश्नाची चौकशी होणे आवश्यक आहे. डॉ. प्रमोद सावंत यांच्या भ्रष्ट भाजप सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. सुशिक्षित बेरोजगार गोव्यातील तरुणांच्या भविष्याशी खेळू नका. स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत सर्व पदांची भरती प्रक्रिया हाच एकमेव पर्याय आहे. एलडीसी पोस्ट स्क्रॅप करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.

 

Web Title: job selling allegations shakes state government congress demands babush monserrate resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.