नोकरी विक्री घोटाळा, ६ तालुक्यांत लोण; आणखी प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2024 01:06 PM2024-11-11T13:06:42+5:302024-11-11T13:08:39+5:30
तपास स्थानिक पोलिसांकडेच
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : नोकरी विक्री प्रकरणाचे लोण आता ६ तालुक्यांत पसरले आहेत. फोंडा, डिचोली, तिसवाडी, सत्तरी, काणकोण आणि मुरगाव अशा सहा तालुक्यातील लोकांची फसवणूक करण्यात आली आहे. आगामी काळात आणखी काही प्रकरणे उघडी होतील, असे संकेत आहेत. परंतु सरकारच्या स्तरावर अद्यापही या प्रकरणाचा तपास स्वतंत्र एजन्सीकडे न देता स्थानिक पोलिस स्थानकांकडेच सोपविण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य हरवते की का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
म्हार्दोळ पोलिस स्थानक परिसरात पूजा नाईक हिच्याविरुद्ध नोकऱ्या विक्री प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला होता. परंतु या प्रकरणातील चौकशीनंतर या पूजाच्या एक-एक करामती उघड होऊ लागल्या. याच पूजाचे डिचोलीतही अनेक कारनामे आढळून आल्यामुळे डिचोली पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. त्यानंतर एकटी पूजाच नव्हे तर असे कारनामे करणाऱ्या दीपनी गावस आणि प्रिया यादव या महिलाही आढळून आल्या. तितक्यावरही न थांबता सतीश मोरे आणि सरिता केरकर या दोघांविरुद्धही अशाच प्रकारचे गुन्हे जुने गोवे पोलिस स्थानकावर नोंदविण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती केवळ म्हार्दोळ आणि डिचोलीपर्यंत मर्यादीत राहिली नाही तर एकूण सहा तालुक्यांत या घोटाळ्याचे लोण पसरले आहेत.
जेव्हा एखाद्या गुन्ह्याची व्याप्ती एकापेक्षा अधिक पोलिस स्थानकांच्या कार्यक्षेत्रापर्यंत जाते, तेव्हा ते प्रकरण स्वतंत्र तपास यंत्रणेकडे दिले जाते. असे गुन्हे क्राइम ब्रचकडे वर्ग केले जातात किंवा विशेष तपास पथक नियुक्त करून त्यांच्याकडे तपास सोपविला जातो. नोकऱ्या विक्री प्रकरणात मात्र अद्याप एसआयटीही नियुक्त करण्यात आलेली नाही तसेच हे प्रकरण क्राइम ब्रँचकडेही सोपविलेले नाही. अजूनपर्यंत पोलिस मुख्यालयाकडून तसा निर्णय घेण्यात आलेला नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
लाखोंचा की कोटींचा?
जसजसा तपास पुढे सरकत आहे, तसतसे या घोटाळ्याचे गांभीर्यही स्पष्ट होऊ लागले आहे. एका-एका नोकरीसाठी ८ ते १० लाख रुपये मागितले होते, असे तक्रारदारांच्या तक्रारीं- वरून स्पष्ट होत आहे. परंतु एका संशयिताने नोकरी देतो, असे सांगून केवळ एका व्यक्तीकडेच पैसे घेतलेले नाहीत तर एकाहून अधिक लोकांकडून पैसे घेतलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलिस स्थानकात तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा १० लाखांचा पाढा कितीवेळ मोजावा लागतो, यावरून या प्रकरणातील एकूण फसवणुकीची रक्कम किती आहे याचा अंदाज घेतला जात आहे. ती कोटींच्या घरातही जाऊ शकते असा अंदाज आहे.