लोकमतच्या गजानन जानभोर यांना नारायण आठवले पुरस्कार प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2018 10:59 PM2018-04-28T22:59:25+5:302018-04-28T22:59:25+5:30
समविचारी पत्रकारांनी आणि लोकांनी एकत्र येऊन समाजोपयोगी सेवाभावी संस्थांची उभारणी करावी. त्याचबरोबर अशा संस्थांच्या उभारणीतून समाजिक बांधिलकी जोपासली जाईल, असे मत ज्येष्ठ पत्रकार, माजी खासदार भारतकुमार राऊत यांनी व्यक्त केले.
पणजी : समविचारी पत्रकारांनी आणि लोकांनी एकत्र येऊन समाजोपयोगी सेवाभावी संस्थांची उभारणी करावी. त्याचबरोबर अशा संस्थांच्या उभारणीतून समाजिक बांधिलकी जोपासली जाईल, असे मत ज्येष्ठ पत्रकार, माजी खासदार भारतकुमार राऊत यांनी व्यक्त केले.
फोंडा येथील लोकविश्वास प्रतिष्ठानच्या वतीने जाहीर झालेला स्व. नारायण आठवले स्मृती पत्रकारिता पुरस्कार शनिवारी दैनिक लोकमतचे नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक गजानन जानभोर यांना खासदार राऊत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर लोकविश्वास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनुप प्रियोळकर, साखळीच्या सरकारी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जेर्वास्लो मेंडिस, नारायण नावती यांची उपस्थिती होती. स्मृतिचिन्ह, मानपत्र, रोख १५ हजार रुपये आणि शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
राऊत म्हणाले की, पत्रकारांचे कर्तृत्व हे कोणाला धक्क्याला लावले, कोणाची दुकाने बंद केली, कोणाच्या चाळी पाडल्या, किती मुख्यमंत्री घरी पाठविले, किती मंत्री गजाआड करायला लावले अशा कामांत मोजली जाते. गजानन जानभोर यांच्यासारखी माणसे पत्रकारिता करीत लोकजीवन घडविण्याचे काम करतात. पत्रकारांनी केलेले काम हे समाजविधायकच असते. त्याचबरोबर त्यांनी समाजातील दुषणे काढली नाही तर समाज शुद्ध होणार नाही.
या वेळी राऊत यांनी सांगितले की, बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेल्या ‘दर्पण’पासून मुंबईत सुरू झालेल्या ‘मिरर’पर्यंतचा पत्रकारितेचा प्रवास हा समाजाला आरसा दाखविणारा आहे. त्यातही चांगला आरसा सापडणे कठीण आहे. पत्रकारांनी लोकविश्वाससारख्या संस्था स्थापन केल्या तर ते लोकांपर्यंत जाऊ शकतात. त्यासाठी समविचारी पत्रकारांनी व लोकांनी एकत्र येऊन समाजोपयोगी सेवाभावी संस्थांची उभारणी करावी, तर त्या संस्था वाढत जातील.
‘लोकमत’ने दिलेल्या स्वातंत्र्यामुळे आपण समाजोपयोगी कामे करू शकलो, असे सांगून गजानन जानभोर म्हणाले की, पत्रकारिता असे माध्यम आहे की त्यातून आपण समाजाचे भले करू शकतो. श्रीमंत आणि राजकीय लोकांची घेतलेली मदत ही स्वत:साठी नाही तर समाजासाठी मागायची असते, त्यामुळे ती मदत वाईट नसते. त्याचबरोबर आपण केलेल्या मदतीतून आत्मिक समाधान तर लाभलेच; पण या पुरस्काराने अंगी अहंकार येऊ नये, तर आपल्याला बळही मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी प्राचार्य मेंडिस यांनी मनोगत व्यक्त केले. अनुप प्रियोळकर यांनी स्वागत केले. सिद्धी उपाध्ये हिने सूत्रसंचालन केले. नारायण नावती यांनी आभार मानले.
पुरस्काराची रक्कम परत!
लोकविश्वास प्रतिष्ठान ज्या मुलांसाठी काम करीत आहे, ते वाखाणण्याजोगे आहे. ‘लोकविश्वास’ने पुरस्कार म्हणून दिलेली रक्कम ही कोणाकडून घेतलेली नाही, तर सामान्यजनांची आहे. त्यामुळे ही रक्कम आपण आपल्यासाठी वापरणार नाही, तर सामाजिक बांधिलकी जोपासत संस्थेला परत करीत आहोत, असे सांगत गजानन जानभोर यांनी १५ हजार रुपयांच्या रकमेत स्वत:चे ६ हजार रुपये घालून २१ हजार रुपये संस्थेकडे सुपूर्द केले. ही रक्कम संस्थेच्या १४ शाळांमध्ये विधायक कामासाठी वापरावी, अशी सूचना त्यांनी केली. त्याचबरोबर ‘लोकविश्वास’चे विदर्भामध्ये काम कसे सुरू होईल, यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी आश्वासनही दिले.