पत्रकारांनी एनजीओंवरही लिहावे: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
By वासुदेव.पागी | Published: November 16, 2023 05:36 PM2023-11-16T17:36:14+5:302023-11-16T17:36:57+5:30
मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित जागतिक पत्रकारिता दिन सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.
पणजी: पत्रकारांनी सरकारच्या चुका दाखवाव्याच, परंतु बिगर सरकारी संस्थांकडून होणाऱ्या चुकांवरही पत्रकारांनी उजेड टाकावा असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. पणजी येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित जागतिक पत्रकारिता दिन सोहळ्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी सांगितले की पत्रकारांनी राजकारण्यांवर लिहावे इतकेच नव्हे तर सरकारवर आवर्जुन लिहावे. कारण चुका दाखविल्या तरच सरकार चांगले काम करू शकते. शिवाय चुका सुधारण्याचा प्रयत्नही सरकारकडून वेळोवेळी केले जातात असे मुख्यमंत्री म्हणाले.
सरकारच्या चुका दाखवितानाच राज्यातील बिगर सरकारी संस्थांच्या कावाईंवरही पत्रकारांनी लक्ष्य द्यावे. त्यांच्याही चुका दाखवून द्याव्यात असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.पत्रकारांच्या सर्व मागण्या आजपर्यंत आपण मंजुर केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पत्ररकारितेत गुन्हेगारी वृत्तीचा शिरकाव होत असल्याचे आपण कधी बोललो नाही आणि बोलणारही नाही, परंतु पत्रकारांना जर असे वाटत असेल तर पत्रकार संघटनेनेच त्यावर तोडगा काढावा, सरकार त्यासाठी सहाय्य करेल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पत्रकारांसाठी सवलतीच्या दरात ईबाईक योजनाही मार्गी लागत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच पत्रकार सुरक्षा कायद्याचीही अंमलबजावणी होणार असल्याचे सांगितले. सरकारी खात्यातील जनसंपर्क अधिकाऱ्यांना पत्रकारांना आवश्यक माहिती देण्याच्या सूचना देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गोवा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजतिलक नाईक यांनी यावेळी पत्रकारांपुढील समस्यांचे कथन मुख्यमंत्र्यांकडे केले. माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक दीपक बांदेकर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
प्रमोद खांडेपारकरना जीवनगौरव- ज्येष्ठ पत्रकार प्रमोद खांडेपारकर यांना यंदाचा जीवन गौरव पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. त्याच बरोबर ज्येष्ठ पत्रकार विजय डिसोझा, एश्ली रोझारिओ, शेखर ऊर्फ विलास महाडिक, नरेंद्र तारी आणि विठू सुकडकर यांचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.