मैत्रिणाला मेसेज केला, 'मी आत्महत्या करेतय'; उडी मारणाऱ्या महिलेचे पोलिसांनी वाचवले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 10:57 AM2023-08-08T10:57:42+5:302023-08-08T10:58:23+5:30
कॉन्स्टेबलची सतर्कता
लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा: मी प्रचंड मानसिक तणावाखाली असून आत्महत्या करीत आहे. माझ्या मुलांचा सांभाळ करा, असा मेसेज आपल्या मैत्रिणीला पाठवून पीर्ण-वझरी येथील पुलावरून उडी मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून वाचवले.
पोलिस उपअधिक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सकाळी १० च्या सुमारस एक महिला पुलावरुन आत्महत्या करणार असल्याची माहिती देण्यासाठी त्या महिलेचा भाऊ व तिची मैत्रीण कोलवाळ पोलिस स्थानकावर आले. "आपण अडचणीत असल्याने आत्महत्या करत आहे', मेसेज त्या महिलेने आपल्या मैत्रिणीला पाठवला होता. आपल्या दोन मुलांना शाळेत सोडल्यानंतर तिने मेसेज करून आपला फोन बंद केला. ती महिला कुठे गेली याचा याचा ठाव ठिकाणाही आपल्याला नसल्याचे मैत्रीणीने पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने निरीक्षक विजय राणे यांच्या नेतृत्वाखालील विविध ठिकाणी पोलिसांचे पथक पाठवून त्या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली.
या दरम्यान त्या महिलेची दुचाकी पीर्ण-वझरी येथील पुलावर दिसली. त्याचवेळी ती महिला पुलावरून उडी मारण्याच्या तयारीत असताना पोलिस कॉन्सटेबल रमेश परब ऊर्फ मुन्ना यांनी धाव घेत तिला वाचवले.
कॉन्स्टेबलची सतर्कता
वझरी पुलाच्या दिशेने ही महिला गेल्याची माहिती मिळताच त्या पुलापासून जवळ असलेल्या मेणकुरे येथील रमेश परब ऊर्फ मुन्ना या पोलिस कॉन्सटेबलशी पोलिसांनी संपर्क साधला व घटनेची माहिती दिली. रमेश ड्युटीवर नसतानाही त्यांनी पुलाच्या दिशेने धाव घेतली व पुलावरुन उडी मारण्याच्या तयारीत असणाऱ्या त्या महिलेला आत्महत्या करण्यापासून वाचवले.