फक्त पावसाला दोष? स्मार्ट सिटी प्रकल्पामुळे पणजी बुडाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2024 10:38 AM2024-07-09T10:38:32+5:302024-07-09T10:39:28+5:30
स्मार्ट सिटी प्रकल्पाचे तीन तेरा वाजले आहेत, हे पावसाने नव्याने पुन्हा एकदा दाखवून दिले.
सोमवारी सकाळपर्यंत २४ तासात पणजीत १४ इंच पाऊस पडला. ही अतिवृष्टीच आहे. ५१ वर्षात दुसऱ्यांदा असे घडले आहे. ढगफुटी झाली नाही पण तसेच काही तरी घडल्यासारखे वाटावे अशा पद्धतीने पूर्ण गोव्यात वृष्टी झाली. रविवारी व सोमवारी पडलेल्या प्रचंड पावसामुळे हाहाकार उडाला. सगळीकडे पूरसदृश स्थिती निर्माण झाली. उत्तर आणि दक्षिण गोव्यातील काही पुलांवरून पाणी गेले, साकव तर बुडालेच होते. लोकांच्या घरांत पाणी शिरले, पणजीत १८ जून रस्त्याला पूर्णपणे मोठ्या नदीचे रूप आले होते. स्मार्ट सिटी प्रकल्पाचे तीन तेरा वाजले आहेत, हे पावसाने नव्याने पुन्हा एकदा दाखवून दिले.
पणजीत अनेक ठिकाणी पावसाचे पाणी तुंबले. अनेक रस्ते बुडाले, रस्ते खचल्याचेही दिसून आले. दोनापावल येथे एक कार रुतली. अर्थात पाऊस खूप पडल्याने पणजीत पुरासारखी स्थिती आली असे म्हटले की आपले काम झाले असे राज्यकर्त्यांना वाटते की काय? पणजीचे लोक सांगतात की, मिरामारला लेक व्ह्यू कॉलनीत कधीच मोठ्या प्रमाणात रस्ते बुडाले नव्हते. कधीच असे पाणी तुंबून राहिले नव्हते. पस्तीस वर्षांनंतर असा अनुभव आलाय.
सगळीकडेच तळी तयार झाली आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पावर पाचशे ते एक हजार कोटी रुपये खर्च झाल्यानंतर देखील जर पणजीत सुधारणा होत नसेल तर दोष केवळ पावसालाच देऊन गप्प राहता येणार नाही. अतिवृष्टी झाली हे सर्वांनाच मान्य आहे. मात्र पणजीतील सर्वच भागात साधनसुविधांची दैना उडावी व सगळीकडेच पाणी साचावे हे अतिच झाले. याबाबत गोवा साधनसुविधा विकास महामंडळ, पणजी महापालिका आणि स्मार्ट सिटी कंत्राटदाराने लोकांना उत्तर द्यायला हवे. गोवा सरकारकडून लोकांना मोठ्याशा अपेक्षा राहिलेल्या नाहीत. कंत्राटदारांना कामाची ऑर्डर दिली की आपले काम झाले असे सरकारला वाटते, धारगळ वगैरे भागात महामार्गावर बघा कशा दरडी कोसळतात, काही कंत्राटदार म्हणजे सरकारी जावई झालेले आहेत.
केंद्र सरकार गोव्यात महामार्ग रुंद करायला व पूल बांधायला हजारो कोटी रुपयांचा निधी देते. मात्र, कंत्राटदार कोण असावा तेदेखील दिल्लीतच ठरते. एक विचित्र व्यवस्था अस्तित्वात आली आहे. विमानतळ बांधले जाते; पण कंत्राटदार कंपनीला कामाचे कंत्राट कसे मिळवायचे ते कळते. सामान्य माणूस डोळे फाडून विकासाचे रूप पाहत राहतो. सगळीकडे काँक्रीटचा विकास. पाणी जायला वाव नाही. सर्वत्र बांधकामे, जे पणजीत घडतेय तेच आजूबाजूला घडतेय. ताळगाव, मेरशी, पर्वरी, म्हापसा, बांबोळी आदी सर्व भागात पुढील दहा वर्षात रस्त्यांना नद्यांचेच रूप येईल. पाणी जाण्यासाठी शेते शिल्लक राहणार नाहीत, आताच अनेक शेते संपली आहेत. बिल्डर्स सगळीकडेच बांधकामे करतात. पूर्वी पाणी शेतात किंवा नैसर्गिक तळ्यात जाऊन थांबायचे. मांडवी नदीच्या दिशेने पाणी जायचे, आता तसे होत नाही. काल पणजीत लोकांनी डालक पाहिली आहे.
आमदार तथा मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी काल सोईस्कर विधान केले, प्रचंड पाऊस पडल्याने पणजीत पाणी तुंबले, पण हा कसोटीचा क्षण आहे असे मोन्सेरात बोलले. स्मार्ट सिटीची कामे करताना काय चुकले आहे ते आता कळून येईल व त्याप्रमाणे उपाययोजना करता येईल. त्यांचे हे विधान ऐकण्यासाठी वरवर चांगले, गोंडस वाटते. मात्र, पणजीतील लोकांच्या वाट्याला येणारे भोग कधी संपतील ते ना आमदार सांगत, ना कंत्राटदार, उत्तर गोव्याचे खासदार तर पणजीच्या दुर्दशेची कधीच पाहणी करत नाहीत. आपण पाहणी केली तर मोन्सेरात यांना राग येईल असे कदाचित त्यांना वाटत असावे, पणजीत वारंवार रस्ते फोडले जातात, रस्त्यांवर खड्डे अजून कायम आहेत.
१८ जून रस्त्याकडेचे गटार तसेच पणजीतील काही नाले वगैरे साफ केले गेले होते. कित्येक महिने अनेक रस्ते खोदून ठेवले होते. सांडपाणी निचरा व्यवस्था ठीक केली जात होती. नव्या वाहिन्या टाकल्या जात होत्या. लोकांनी व दुकानदारांनी सगळे काही सहन केले. मध्यंतरी अनेक व्यावसायिकांची दुकाने बंद राहिल्याने बरेच नुकसानही झाले. पणजी-पाटो- मिरामार व परिसरात वारंवार पावसाच्या पाण्याने रस्ते भरणार असतील तर स्मार्ट सिटी प्रकल्पावरील पैसे वाया गेले, असेच म्हणावे लागेल.