हिवाळी अधिवेशनात एसटी बांधवांना न्याय: सदानंद तानावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2024 11:00 AM2024-08-15T11:00:51+5:302024-08-15T11:01:20+5:30
राजकीय आरक्षण विधेयक संमत करु
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्यातील एसटी बांधवांना विधानसभेत राजकीय आरक्षण देण्याबाबत भाजप गंभीर आहे. नोव्हेंबरमध्ये संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एसटी आरक्षण विधेयक संमत करून या समाजाला न्याय दिला जाईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत बोलताना तानावडे म्हणाले की, विरोधकांनी कामकाज होऊ न दिल्याने हे विधेयक नुकत्याच झालेल्या संसदेच्या अधिवेशनात संमत होऊ शकले नाही. परंतु, नोव्हेंबरमध्ये हे निश्चितच संमत होईल. राज्यसभेत गोव्याच्या विविध प्रश्नांवर आपण आवाज उठविल्याचे सांगून तानावडे म्हणाले की, एकूण ९० प्रश्न मी सादर केले होते. त्यातील ३० प्रश्न चर्चेला आले. वेगवेगळ्या वित्तीय कंपन्या मोठमोठ्या व्याजाचे आमिष दाखवून लोकांकडून गुंतवणूक करून घेतात. परंतु, नंतर चुना लावून पसार होतात. हा विषय मी मांडला. गोव्याच्या खाजन जमिनींचे रक्षण करण्यासाठी केंद्राने आर्थिक व तांत्रिक मदत द्यावी, अशी मागणी मी केली आहे. केंद्रीय जलशक्तीमंत्र्यांना पत्र लिहून ५०० कोटी रुपये या कामांसाठी मी मागितले आहेत. खाजन जमिनी बांध फुटून नष्ट होतात. अनेकदा पुरात शेती वाहून जाते. हे प्रकार रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
दुसरी गोष्ट म्हणजे एर्नाकुलम-पुणे एक्स्प्रेसला थिवी येथे थांबा दिलेला नाही, तो दिला जावा, अशी मागणी मी संसदेत केलेली आहे असे तानावडे यांनी सांगितले.
थोडे दिवस थांबा...
लोकांची नाराजी पत्करून विधेयके संमत करून चालणार नाही. पक्षाकडे बहुमत असले तरी जबाबदारीनेच वागावे लागेल. विधानसभेत प्रश्न उपस्थित करणे सोपे. परंतु, ते करणाऱ्यांनी आधी आपण काय केले हे पाहायला हवे. थोडे दिवस थांबा, मी लोकांसमोर महत्त्वाची माहिती उघड करीन, असेही ते म्हणाले.