गोव्याहून महाराष्ट्रात जाणारी कदंबची बससेवा तिसऱ्या दिवशीही बंद, सोलापूरची गाडीही रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2017 12:11 PM2017-10-19T12:11:16+5:302017-10-19T12:12:06+5:30
महाराष्ट्रात एसटी बसगाड्यांचा संप सुरूच राहिल्याने गोव्याहून महाराष्ट्रात जाणारी कदंब वाहतूक महामंडळाची बससेवा सलग तिसऱ्या दिवशीही बंद आहे.
पणजी : महाराष्ट्रात एसटी बसगाड्यांचा संप सुरूच राहिल्याने गोव्याहून महाराष्ट्रात जाणारी कदंब वाहतूक महामंडळाची बससेवा सलग तिसऱ्या दिवशीही बंद आहे. तीन दिवस महाराष्ट्रात गोव्याच्या बसेस बंद ठेवण्याची वेळ यापूर्वी कधीच गोव्याच्या कदंब महामंडळावर आली नव्हती. एसटींच्या संपामुळे गोवा कदंब वाहतूक महामंडळ रोज साडेचार लाख रुपयांच्या महसुलाला मुकत आहे. तीन दिवसात 13.5 लाखांचे उत्पन्न बुडाल्याचे महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
गोव्यातील हजारो प्रवाशांची गैरसोय झाली आहे. खासगी बसगाड्या गोव्याहून महाराष्ट्रात जात असल्या तरी महाराष्ट्रातील अंतर्गत भागांमध्ये या बसगाड्या प्रवासी वाहतूक करत नाहीत. या गाड्या पणजीहून फक्त पुणे व मुंबईला जातात. कदंब वाहतूक महामंडळाची थेट सोलापुरला जाणारी बसगाडीही गुरूवारी बंद ठेवण्यात आली आहे.
गोव्याहून महाराष्ट्रातील एकूण चौदा मार्गांवर रोज 37 बसगाड्या प्रवासी वाहतूक करतात . यापूर्वी कधीच दिवाळीत गोमंतकीय प्रवाशांची एवढी मोठी गैरसोय झाली नव्हती. यापुढेही एसटींचा संप सुरू राहिला तर पोलिस बंदोबस्तात गोव्याहून कदंबच्या बसगाड्या महाराष्ट्रात पाठवाव्यात असाही विचार महामंडळाच्या व्यवस्थापनाने चालवला असल्याचे सूत्रांनी सांगितले.