ड्युटीवर असताना वारंवार मद्यपान; सात कर्मचाऱ्यांना कदंब महामंडळाने केले बडतर्फ
By पूजा प्रभूगावकर | Published: June 16, 2024 05:45 PM2024-06-16T17:45:35+5:302024-06-16T17:46:04+5:30
कदंब बसेसचे चालक मद्यपान करुन बस चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालत असल्याचे प्रकार यापूर्वी आढळून आले होते.
पणजी: ड्युटीवर असताना वारंवार मद्यपान करणाऱ्या सात चालकांना कदंब महामंडळाने मागील सहा महिन्यात सेवेतून बडतर्फ केले आहे. मद्यपी कर्मचाऱ्यांविरोधात कदंब ने विशेष मोहीम हाती घेतली असून या अंतर्गत ही कारवाई केली आहे.
कदंब बसेसचे चालक मद्यपान करुन बस चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालत असल्याचे प्रकार यापूर्वी आढळून आले होते. त्यानंतर कदंब महामंडळाने मद्यपी कर्मचाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा इशारा दिला होता. या अंतर्गत राज्यात सहा बसस्थानकांवर कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यासाठी महामंडळाने आल्कोमीटर नियुक्त केले आहेत.
कदंब कडून चालकांची या बसस्थाकांनावर तपासणी केली जाते. यात जर चालकाने ऑन ड्यटी मद्यपान केल्याचे आढळून आले तर त्याला कारणे दाखववा नोटीस बजावून त्याची अन्य मार्गावर बदली केली जाते. मात्र त्यानंतर सुध्दा तो ड्युटीवर असताना मद्यपान करीत असल्याचे आढळून येत असल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करुन सेवेतून बडतर्फ केले जाते. असे मागील सहा महिन्यात कदंब महामंडळाने सात चालकांना सेवेतून बडतर्फ केल्याची माहिती सुत्रांनी दिली.