कदंबच्या ताफ्यात आता खासगी बसेस; 'माझी बस' योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 12:50 PM2023-05-25T12:50:57+5:302023-05-25T12:51:45+5:30

माझी बस' या नावाने ही योजना अमलात आणली जाईल.

kadamba fleet now includes private buses cabinet meeting approves majhi bus scheme | कदंबच्या ताफ्यात आता खासगी बसेस; 'माझी बस' योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी

कदंबच्या ताफ्यात आता खासगी बसेस; 'माझी बस' योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: खासगी बसगाड्या भाड्याने चालवायला घेण्याच्या कदंब परिवहन महामंडळाच्या योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. माझी बस या नावाने ही योजना अमलात आणली जाईल.

कदंब महामंडळाकडून यापूर्वीच या योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी निविदा जारी करून योजनाही बनविण्यात आली होती. योजनेच्या अंमलबजावणीसाठी मंत्रिमंडळाच्या मंजुरीची प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा आता संपली असून, बुधवारी झालेल्या बैठकीत या योजनेवर चर्चा होऊन योजनेला मंजुरी दिली आहे.

या योजनेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या बसेस शाळांतील विद्यार्थ्यांसाठी वापरण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात लांब पल्ल्याचा मार्गावर या बसगाड्या धावणार आहेत. महामंडळ फक्त बसेस भाड्याने घेणार आहे. बससाठी चालक व बसची देखभाल बसमालकांनाच करावी लागणार आहे. बसमालकांना किलोमीटरप्रमाणे ठरलेला दर दिला जाईल.

१०० विद्यालयांकडून मागणी

कदंब महामंडळाचे अध्यक्ष आमदार उल्हास तुयेकर यांनी यापूर्वी या योजनेची माहिती देताना योजना विशेष करून शालेय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बनविली जात असल्याचे सांगितले होते. किमान १०० विद्यालयांकडून बससाठी मागणी आहे आणि महामंडळाकडे पुरेशा बसगाड्या नाहीत. त्यामुळेच खासगी बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा विचार करण्यात आला होता.

या चार मार्गांवर धावणार...

- पहिला मार्ग काणकोण ते पणजी
- दुसरा मार्ग: सावर्डे ते पणजी 
- तिसरा मार्ग : कुडचडे ते पणजी
- चौथा मार्ग : पेडणे ते पणजी

सर्व बसेस घेणार

सध्या चार मार्ग निश्चित केले असले तरी आणखी मार्ग त्यात सामील केले जाणार आहेत. गोव्यातील सर्वच खासगी बसमालक आपल्या बसगाड्या या योजने अंतर्गत भाडेपट्टीवर देण्यास तयार झाले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महत्त्वाचे निर्णय 

- ४-जीचे टॉवर उभारण्यासाठी ५ गावांतील सरकारी मालकीची जमीन वापरायला देण्यात येणार. त्यातील ३ उत्तर गोव्यात तर २ दक्षिण गोव्यात आहेत.

- तुये पेडणे येथील जलस्रोत खात्याची ३,४१० चौरस मीटर जमीन आत्मनिवास सोसायटीला ४० वर्षांच्या लीजवर देण्यास मंजुरी.

- गोवा लॉजिस्टीक आणि वेअर- हाउसिंग धोरणाला मंजुरी देण्यात आली.

 

Web Title: kadamba fleet now includes private buses cabinet meeting approves majhi bus scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा