कदंबचा प्रवास होणार सुसाट; ५०० इलेक्ट्रिक बसेस आणणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 12:31 PM2023-05-05T12:31:45+5:302023-05-05T12:31:59+5:30
गोमंतकीयांकडून स्वागत; हायटेक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सरकार गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राज्यातील वाहतूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या काळात आता बसेस देखील मागे राहिलेल्या नाहीत. साधारण बसेससोबत आता इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.
सरकारने कदंब महामंडळाच्या सहाय्याने पुढाकार घेत हे महत्वाचे पाऊल उचलले आहे. भविष्याचा विचार करता तंत्रज्ञानयुक्त गोष्टीची जास्त असणार आहे. असाच विचार करत आणि काळासोबत चालताना कदंब महामंडळाने इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर उतरले आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर ई बसेस आणण्यात आल्या होत्या.
१०० पेक्षा जास्त बसेस कार्यरत
राज्यात सध्या जवळपास १०० पेक्षा जास्त इलेक्ट्रिक बसेस कार्यरत आहे. सर्व बसेस सुरळीत सुरु असून, अद्याप तरी याबाबत कुठल्याही तक्रारी समोर येत नाही. त्यामुळे इलेक्ट्रिक बसेसचा हा प्रयोग जवळपास सफल झाल्याची. चिन्हे आहेत.
जी २० परिषदेसाठी या बसेसची सेवा
जी २० आंतरराष्ट्रीय परीषद सध्या राज्यात सुरु आहे. या परीषदचा स्तर पाहता सरकारने इलेक्ट्रिक बसेस सेवा या परीषद दरम्यान सुरु केली. सुमारे ४८ इलेक्ट्रिक बसेस या परीषदच्या सेवेसाठी ठेवण्यात आले आहे.
एवढ्या बसेसचे ध्येय ....
सरकारने आतापर्यंत सुमारे ५०० इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर उतरवण्याचे ध्येय ठेवले आहे. यातील जवळपास १०० बसेस आधीच रस्त्यावर उतरण्यात आले आहे, तर उर्वरीत बसेस काही पुढच्या काही वर्षात रस्त्यावर उतरण्यात येणार असल्याचेही सरकार वारंवार सांगत आहे.
कोणत्या मार्गावर चालतात इलेक्ट्रीक बसेस?
सध्या राज्यातील प्रमुख शहरांमध्ये इलेक्ट्रिक बसेस पोहचल्या आहेत. पणजी ते मडगाव, पणजी ते म्हापसा, पणजी ते वास्को या सारख्या ठिकाणी इलेक्ट्रीक बसेसच्या सेवा सुरु आहेत. तसेच राज्यातील दोन्ही प्रमुख विमानतळावर देखील इ बसेस सेवा देत आहेत.
इलेक्ट्रीक बसेसच्या सेवा उत्तम दर्जाच्या आहेत. आधुनिक साधनसुविधा या बसेस मध्ये आहेत. अनेकदा केव्हा प्रवास सुरु होतो आणि केव्हा संपतो हेच कळत नाही. - अरविंद साळगावकर, प्रवासी.