कदंब महामंडळ सरकारी ‘सलाइन’वरच!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 02:05 PM2018-02-25T14:05:28+5:302018-02-25T14:05:28+5:30
गोवा राज्य सरकारकडून आर्थिक अनुदानाच्या स्वरुपात भरीव मदत मिळत असली तरी सार्वजनिक वाहतूक सेवा देणारे कदंब महामंडळ अजूनही तोट्यातच आहे.
पणजी - राज्य सरकारकडून आर्थिक अनुदानाच्या स्वरुपात भरीव मदत मिळत असली तरी सार्वजनिक वाहतूक सेवा देणारे कदंब महामंडळ अजूनही तोट्यातच आहे. २0१६-१७ या आर्थिक वर्षात ३ कोटी ५३ लाख १0 हजार रुपयांचा तोटा महामंडळाला सहन करावा लागला आहे. सरकारी ‘सलाइनवरच’ महामंडळाचा कारभार चालू आहे.
अधिकृत सरकारी माहितीनुसार सध्या कदंब महामंडळात ९00 चालक, ६५४ वाहक, मॅकॅनिक तसेच प्रशासकीय विभागातील मिळून एकूण २0५३ कर्मचारी आहेत. या सर्व कर्मचाºयांच्या पगारावरच वर्षाकाठी ९५ कोटी ६१ लाख ८६ हजार रुपये तिजोरीतून बाहेर काढावे लागतात.
२0१६-१७ या आर्थिक वर्षात कर्मचा-यांच्या पगारासाठी सरकारने महामंडळाला तब्बल ५२ कोटी ९४ लाख रुपये अनुदान दिले. ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग प्रवाशांना कदंब बसेसमध्ये तिकीटभाड्यात सवलत दिली जाते. या सवलतीची भरपाई म्हणून गेल्या आर्थिक वर्षात सरकारेन २ कोटी ३३ लाख ७८ हजार ५0१ रुपये कदंब महामंडळाला फेडले. विद्यार्थ्यांना निम्म्या भाड्याची सवलत दिली जाते. या सवलतीची भरपाई म्हणून सरकारने १0 कोटी ४२ लाख ४६ हजार ६९७ रुपये फेडले. या शिवाय ‘कदंब’ने आर्थिक विकास महामंडळ तसेच राज्य सहकारी बँकेकडून १0 कोटी रुपये कर्ज घेतले. गेल्या आर्थिक वर्षात एकूण ९५ कोटी ३१ लाख २५ हजार १९८ रुपये एवढे अनुदान ‘कदंब’ला मिळाले.
२0१४-१५ १८ कोटी २६ लाख १८ हजार रुपये तोटा
२0१५-१६ ५ कोटी १९ लाख ५४ हजार रुपये नफा
२0१६-१७ ३ कोटी ५३ लाख १0 हजार रुपये तोटा
२0१६-१७ या आर्थिक वर्षात बसगाड्यांच्या टायर, ट्युबवर १ कोटी ८0 लाख ७५ हजार ४९९ रुपये खर्च करण्यात आले. सुट्या भागांवर २ कोटी १७ लाख ४२ हजार २११ रुपये, मॅकॅनिकांच्या वेतनावरच ९ कोटी ५८ लाख ५३ हजार ९२३ रुपये, बसगाड्यांच्या दुरुस्तीवर २ कोटी ७३ लाख ६२ हजार ४९८ रुपये, बसगाड्या धुण्याच्यासाठी ३६ लाख १४ हजार ५२५ रुपये, बॅटरी बदलण्यासाठी १७ लाख ८५ हजार ३२७ रुपये खर्च करण्यात आले.
कर्मचा-यांच्या निवृत्ती वेतनावरही मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. प्राप्त माहितीनुसार २0१८-१९ या आगामी अर्थिक वर्षात ९३ कर्मचारी सेवानिवृत्त होणार असून त्यांच्या रजा भत्त्यावर अडीच कोटी रुपये तर ग्रॅच्युईटीवर साडेसहा कोटी रुपये बाहेर काढावे लागतील.