कला अकादमी 'कोसळली'; मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 04:45 PM2023-07-18T16:45:07+5:302023-07-18T16:49:20+5:30

चौकशी सुरू; 'आयआयटी रुरकी' करणार तपास.

kala academy goa collapsed a serious note from the chief minister | कला अकादमी 'कोसळली'; मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

कला अकादमी 'कोसळली'; मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

googlenewsNext

पणजी : कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचे छत रविवारी मध्यरात्री कोसळले. निविदा न काढता कंत्राट दिल्याने आधीच वाद असताना या दुर्घटनेमुळे कला संस्कृती खात्याची छी-थू झाली. घटनेबद्दल रंगकर्मीसह सर्व थरातील लोकांकडून तीव्र संताप व्यक्त झाला. सर्वच बाजूने सरकारवर हल्लाबोल झाल्याने मुख्यमंत्र्यांनाही गंभीर दखल घ्यावी लागली. काल सायंकाळी उशिरा मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले. बांधकाम खात्याच्या प्रधान मुख्य अभियंत्यांना प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. कंत्राटदाराकडून स्पष्टीकरण मागवा, असे बजावले असून आयआयटी रुरकीला घटनेचे कारण शोधण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा म्हणून नियुक्त करावे, असे निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल यांनी यासंबंधीचा नोटीस काढला. दुसरीकडे आज मंगळवारी विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या घटनेवरून सरकारला घेरण्याची तयारी विरोधी आमदारांनी केली आहे. कला संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत आहे. आज या विषयावर सभागृहात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. तर चौकशी पूर्ण झाल्यानंतर जनतेच्या माहितीसाठी या प्रकरणी श्वेतपत्रिका काढली जाईल, काब्राल यांनी म्हटले आहे.

आयआयटी रुरकीला लिहिले पत्र

दरम्यान, घटनेचे कारण शोधण्याचे काम आयआयटी, रुरकी करणार आहे. तशी विनंती पार्सेकर यांनी या आयआयटीला पत्र लिहून केली आहे.

कंत्राटदारांकडे स्पष्टीकरण मागविले

बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांनी कंत्राटदार मेसर्स टेक्टॉन बिल्डर्स प्रा लि , मुंबई याच्याकडून आज, १८ तारखेपर्यंत स्पष्टीकरण मागितले आहे. तर स्ट्रक्चरल ऑडिट केलेल्या आयआयटी मुंबईला स्वतंत्र अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी काल दुपारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची सखोल चौकशी केली जाईल असे त्यांनी यावेळी उपस्थित पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. 'सार्वजनिक बांधकाम खात्याच्या प्रधान मुख्य अभियंत्यांनी कला अकादमीमध्ये घटनास्थळी पाहणी केली आहे. त्यांच्याकडून याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मी अधिक भाष्य करू शकेन. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील पावले उचलली जातील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल

खुल्या रंगमंचाचे (ओपन एअर थिएटर) हे छत सुमारे ४३ वर्ष जुने होते. आम्ही काम काम हाती घेतले आहे. त्याचा हा भाग नव्हता. प्रेक्षक जिथे बसतात त्याची आणि व्यासपीठाची आम्ही डागडुजी केली होती. याबाबतचा पाहणी अहवाल आल्यानंतर काही गोष्टी स्पष्ट होतील. अहवाल आल्यानंतर मी स्वतः याबाबत माहिती देईन. - गोविंद गावडे, कला व संस्कृती मंत्री.

चौकशी करा

या घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी. या विषयावर आम्ही विधानसभेत आवाज उठवून पाठपुरावा करणार आहोत. हे सरकार इव्हेंट मॅनेजमेंट करणारे आहे. सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळला आहे. सर्व ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे सुरु आहेत. छत कोसळण्यास संबंधित खात्याचे मंत्री व सरकार जबाबदार आहे. - युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते.
 

Web Title: kala academy goa collapsed a serious note from the chief minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा