कला अकादमीचा सुवर्ण महोत्सव, सहा हजार कलाकारांचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 12:08 PM2019-07-12T12:08:03+5:302019-07-12T12:12:10+5:30
गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटक आणि अन्य राज्यांतलही नावारुपास आलेल्या गोवा कला अकादमीला आता पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत.
पणजी - गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटक आणि अन्य राज्यांतलही नावारुपास आलेल्या गोवा कला अकादमीला आता पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. 15 जुलैपासून वर्षभर कला अकादमी सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रम करणार आहे. एकूण सहा हजार कलाकार कार्यक्रमांमध्ये भाग घेणार आहेत.
कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी शुक्रवारी (12 जुलै) पत्रकार परिषदेत याविषयीची माहिती दिली आहे. कला अकादमीची स्थापना ही मुक्त गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या काळात झाली होती. 1982 साली ही अकादमी कांपाल येथील आकर्षक अशा नव्या वास्तूत आली. वास्तूरचनाकार चाल्र्स कुरैय्या यांनी कला अकादमीची त्याकाळी रचना केली. कला अकादमीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त गोव्यासह गोव्याबाहेरही विविध कार्यक्रम होणार आहेत.
येत्या 15 जुलैला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सोहळ्य़ाचे उद्घाटन केले जाईल. त्यावेळी कला अकादमीचे अध्यक्ष या नात्याने मंत्री गावडे हेही उपस्थित असतील. 1970 पासून एकूण पन्नास वर्षामध्ये कला अकादमीने जे विविध कार्यक्रम आयोजित केले, जे सांस्कृतिक उपक्रम राबविले, त्या सर्वाचे प्रातिनिधीक चित्र कलात्मक पद्धतीने कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडले जाईल. डॉ. प्रकाश वजरीकर व डॉ. पुर्णानंद च्यारी यांनी कार्यक्रमाची संहिता तयार केली आहे. उद्घाटन सोहळ्य़ानंतर कला-तरंग कार्यक्रम सादर केला जाईल. त्यात व्हिडीओ क्लीप्सही दाखविल्या जातील.
गोव्याच्या लोककलांचा आविष्कार पूर्वरंग या कार्यक्रमाद्वारे केला जाईल. अजय नाईक व श्रीमती पौर्णिमा केरकर या कार्यक्रमासाठी समन्वयक म्हणून काम पाहतील. हेमू गावडे, अविनाश गावडे व साथी, दिव्या नाईक, शुभदा च्यारी, दत्ताराम सावंत, शुभम नाईक, माईणकर, कॉज्मा फर्नाडिस व साथी कलाकारांकडून लोककला सादर केल्या जातील. वर्षभर कार्यक्रम चालतील. गोंयचो गाज हा एकूण शंभर कलाकारांचा कार्यक्रम कला अकादमी तयार करत आहे. कार्यक्रम तयार होण्यास तीन ते साडेतीन महिन्यांचा कालावधी लागेल. गोव्यातील पारंपरिक वाद्ये व संस्कृतीचे दर्शन या कार्यक्रमामधून देशाच्या विविध भागांतील लोकांना होईल, असे मंत्री गावडे यांनी स्पष्ट केले.