कला अकादमीप्रश्नी सरकारला फुटला घाम; पहिल्याच दिवशी पहिल्या तासाला विरोधकांचा गदारोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 04:21 PM2023-07-19T16:21:37+5:302023-07-19T16:23:46+5:30
अधिवेशनाचे कामकाज रोखत सभापतींच्या आसनाकडे धाव
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अधिवेशन सुरू होताच विरोधकांनी कला अकादमीचे बांधकाम कोसळण्याच्या मुद्दयावरून आणि नूतनीकरणाच्या कथित घोटाळ्यावरून कामकाज रोखून धरले.
विरोधक भ्रष्टाचारविरोधी घोषणांचे फलकच घेऊन आले होते. सभापती सभागृहात येऊन राष्ट्रगीत झाल्यावर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी उभे राहून कला बांधकामाच्या कथित अकादमीच्या भ्रष्टाचार प्रकरणावर अर्धा तास चर्चा घेण्याची मागणी केली. या मागणीचा सभापतींकडे आग्रह धरताना युरी आलेमाव, विजय सरदेसाई, एल्टन डिकॉस्टा, कार्लस फेरेरा, वेन्झी व्हीएमश, क्रूझ सिल्वा आणि वीरेश बोरकर यांनी सभापतींच्या पटलाकडे धाव घेतली. सभापती रमेश तवडकर यांनी त्यांना प्रश्नोत्तराचे कामकाज संपल्यावर चर्चा करू या, असे सांगितले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही नंतर या विषयावर ते निवेदन करणार असल्याचे सांगितले.
मात्र विरोधक आपल्या चर्चेच्या मागणीवर ठाम राहिले. पावणे बारा वाजेपर्यंतचे कामकाज रोखून धरले. त्यानंतरही विरोधकांनी कामकाज चालू न दिल्यामुळे सभापतींनी अर्धा तास कामकाज तहकूब करण्यात येत असल्याचे जाहीर केले.
मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा
मुख्यमंत्र्यांनी चौकशीचा आदेश दिला असला तरी संबंधित मंत्र्यांचा या प्रकरणात राजीनामा घ्यावा, अशी मागणी विजय सरदेसाई यांनी केली. युरी आलेमाव यांनी या मागणीचे समर्थन केले. मात्र मुख्यमंत्र्यांनी चौकशी अहवाल अगोदर मिळने आवश्यक असल्याचे सांगितले.
न्यायालयात ७ रोजी सुनावणी
कला अकादमीच्या बांधकामाच्या प्रकरणात कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात प्रलंबित आहे. कला अकादमीच्या इमारतीचा भाग कोसळल्यानंतर गोवा फॉरवर्डने खंडपीठात याचिका सादर करून हे प्रकरण लवकर सुनावणीस घेण्याची मागणी केली होती. हे प्रकरण आता ७ ऑगस्ट रोजी सुनावणीस ठेवण्यात आले आहे.
एल्टनची वेगळी भूमिका
रोधक कला अकादमीच्या मुद्द्यावरुन गदारोळ करणार हे अपेक्षित होते. मात्र, रणनीतीच्या बाबतीत ते गोंधळल्याचे दिसले. कारण एकीकडे चर्चेची मागणी करून कामकाज रोखून धरत असताना दुसरीकडे काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्टा हे सभापतींनी त्यांचे प्रश्न विचारण्यासाठी नाव पुकारल्यावर आपल्या जागेवर जाऊन प्रश्न विचारू लागले. यावरूनच विरोधकांकडे ऐक्याचा अभाव दिसून आला.
कारवाई होणारच : मुख्यमंत्री सावंत
प्रश्नोत्तराचा तास संपल्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कला अकादमीचे बांधकाम कोसळण्याच्या मुद्यावर निवेदन केले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कला अकादमीचे नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीचा भाग कोसळलेला नाही, तर ज्याचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही त्या ठिकाणचा काहीसा भाग कोसळला आहे. ते बांधकाम कोसळण्याच्या बाबतीत पूर्ण चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. चौकशीसाठी स्वतंत्र एजन्सी नियुक्त केली जाणार आहे आणि या प्रकरणात जबाबदार असलेल्या कुणालाही सोडणार नाही. तसेच चौकशी अहवालही सभागृहात सादर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
मला टार्गेट केले जातेय : गोविंद गावडे
कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचा भाग कोसळला. मात्र, या विषयावरून मला टार्गेट केले जात आहे. प्रकार म्हणजे बहुजन समाजाचे नेतृत्व संपवण्याचा डाव असल्याचा आरोप कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केला. ही घटना समजताच आपण त्वरित तेथे पाहणी करण्यासाठी गेलो. जे घडले तो अपघात असून त्याला आपण किंवा अभियंते जबाबदार नाही. ज्या ठिकाणी हा भाग कोसळला तेथे सुरक्षारक्षक जेवणासाठी बसतात; परंतु, तेव्हा तेथे कुणी नव्हते. घडलेल्या घटनेची सखोल चौकशी व्हावी. कला अकादमीच्या नूतनीकरणासाठीचे कंत्राट निविदा न मागवताच देण्याचा निर्णय आपला नसून तो सार्वजनिक बांधकाम खात्याचा आहे; परंतु, तरीही आपल्याला टार्गेट केले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.