कला अकादमीप्रश्नी सरकारची अडचण; कलाकारांनी व्यक्त केली नाराजी, विरोधकांकडून नव्याने टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 13:06 IST2025-04-15T13:05:26+5:302025-04-15T13:06:03+5:30
मंत्री गावडे यांनी मागितला प्रकरणाचा अहवाल

कला अकादमीप्रश्नी सरकारची अडचण; कलाकारांनी व्यक्त केली नाराजी, विरोधकांकडून नव्याने टीका
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: येथील कला अकादमीतील नाट्यगृहात रविवारी महत्त्वाचा नाट्यप्रयोग वीज व ध्वनीविषयक समस्येमुळे बंद करावा लागला. याचा महाराष्ट्रातील कलाकारांना कटू अनुभव आला. या विषयावरून गोवा सरकार पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य बनले आहे. राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया येत असून कलाकार वर्ग नाराज झाला आहे. अकादमीत सुधारणा करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
कला अकादमीतील नाट्यगृहात सोमवारी झालेल्या प्रकाश व्यवस्थेतील त्रुटींसंबंधी कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी अहवाल मागितला आहे. कला अकादमीच्या नाट्यगृहात रविवारी 'पुरुष' या नाटकाच्या सादरीकरणादरम्यान तांत्रिक बिघाड झाला होता. प्रकाश व्यवस्था बिघडली होती. त्यामुळे पडदा टाकावा लागला होता आणि नाटक १५ मिनिटे थांबवावे लागले होते. या प्रकारानंतर कला अकादमीच्या बांधकामासह मंत्री गोविंद गावडेंवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
विशेष म्हणजे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच या नाट्यगृहाला व्यवस्थापक नसल्याचे ऐकून आश्चर्य व्यक्त केले होते. कला अकादमीच्या सदस्य सचिवांना याविषयी अहवाल सादर करण्यास सांगितल्याचे मंत्री गावडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. या प्रकरणामुळे कला अकादमीचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. तर विरोधकांना टीकेचे आणखी एक निमित्त सापडले आहे.
गोव्याच्या छबीला धक्का : मनोज परब
कला अकादमीत 'पुरुष' नाटकाच्या प्रयोगावेळी प्रकाश योजनेचा जो खेळखंडोबा झाला, त्यामुळे गोव्याच्या छबीला धक्का बसू शकतो, अशी टीका रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाचे नेते मनोज परब यांनी केली. कला अकादमीची वास्तू ही आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे. या ठिकाणी आतापर्यंत अनेक कलाकारांनी नाटकाचे प्रयोग केले असून, सोबत चांगल्या आठवणी घेऊन गेले आहेत. मात्र, रविवारी 'पुरुष' नाटकाच्या प्रयोगावेळी प्रकाशयोजनेचा जो घोळ झाला, ते योग्य घडले नाही, अशी टीका करून परब म्हणाले की, वरील नाटकाच्या प्रयोगासाठी म्हणे आयोजकांनी सोबत साउंड सिस्टीम आणली होती. यावरून त्यांना कला अकादमीच्या साउंड सिस्टमवर विश्वास नाही, असेच स्पष्ट होते. त्यातही जर त्यांना तेथील प्रकाशयोजनेचा बोजवारा उडेल, याची कल्पना असती तर कदाचित त्यांनी त्याही सोबत आणल्या असत्या. नाटकाच्या प्रयोगावेळी जो गोंधळ उडाला, यामुळे गोव्याच्या कला क्षेत्राबाबतच्या छबीला धक्का लागू शकतो, अशी टीका त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे : राजदीप नाईक
कला अकादमीची दुरुस्ती योग्य प्रकारे झालेली नाही. याविषयी आम्ही अनेकवेळा सांगितले आहे. पण सरकारने आमच्या मागणीकडे दुलर्क्ष केले. आता प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी कला अकादमीच्या कामावर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी लक्ष घालावे, अशी मागणी प्रसिद्ध नाट्यकलाकार राजदीप नाईक यांनी केली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुन दुरुस्ती केली. पण यात काहीच सुधारणा केलेली नाही. जनतेचे पैसे वाया गेले आहेत. या विषयी कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांना कलाकारांचे काहीच पडलेले नाही, असेही ते म्हणाले.
पोलिसांनी अकादमीच्या कामातील भ्रष्टाचार शोधून काढावा : अमित पालेकर
कला व संस्कृतीचे प्रतीक असलेल्या ऐतिहासिक कला अकादमी इमारतीचा भ्रष्टाचारामुळे विनाश झाल्याचा आरोप आपचे निमंत्रक अॅड अमित पालेकर यांनी केला आहे. भाजप सरकारने गोमंतकीय कलाकारांच्या भावना पायदळी तुडविल्या आहेत. दुरुस्ती नंतर 'ताजमहल ऑफ गोवा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कला अकादमीवर झालेल्या खर्चात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत आपण पोलिसांकडे तक्रार देत असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणाची योग्य चौकशी करण्याची मागणी पालेकर यांनी केली. सार्वजनिक निधीचा अपव्यय करून ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाचे नुकसान केले गेले आहे. हे एक कला मंदिर होते, ते आता भ्रष्टाचाराच्या लोभामुळे उद्ध्वस्त झाले असून याला हे भाजप सरकार जबाबदार असल्याचेही पालेकर यांनी म्हटले आहे.
राज्याची बदनामी झाली : सिसील
कला अकादमीच्या ढिसाळ कारभारामुळे पूर्वी कलाकारांना मनस्ताप व्हायचा. आता त्यांच्यामुळे राज्याचे नावही खराब होत आहे. नुकत्याच एका दर्जेदार नाटकादरम्यान प्रकाशयोजना खराब असल्याचे समोर आले. यातून मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांना त्रास झाला व अखेर पडदा टाकण्याची वेळ आली. यातून राज्याचीदेखील बरीच बदनामी झाली. कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी आपच्या नेत्या, तथा नृत्य कलाकार सिसील रॉड्रिग्स यांनी केली.
६० कोटी गेले कुठे?
कला अकादमी ही राज्यातील प्रतिष्ठित वास्तूंपैकी एक आहे; पण गेल्या काही वर्षांत या वास्तूला सरकारने बदनाम केले आहे. ६० कोटी रुपये खर्च करून कला अकादमीचे नूतनीकरण करण्यात आले होते. एवढे पैसे खर्च करूनदेखील यात काही मोठा बदल दिसत नाही. उलट ही वास्तू अधिक खराब झाली. यापूर्वी अनेक कलाकारांना याचा वाईट अनुभव आला. यातून अनेक आंदोलने, निषेध कलाकारांनी केला, परंतु सरकार या गोष्टी मान्य करायला तयार नाही, असेही रॉड्रिग्स यांनी सांगितले.
कला अकादमीत घडलेल्या प्रकाराबद्दल मी सध्या काहीच बोलणार नाही. या प्रकरणाचा मी सविस्तर अहवाल मागवला आहे. अहवाल मिळाल्यानंतर नेमके काय झाले ते समोर येईल. त्यानंतर या प्रकरणावर मी भाष्य करेन, कला अकादमीचे काम योग्य आणि उत्तम दर्जाचेच झाले आहे. मात्र काहीजण निरर्थक टीका करत आहेत. - गोविंद गावडे, कला आणि संस्कृती मंत्री