गोव्यातील कळंगुट परिसरात वर्षभरात अमली पदार्थांचे 31 गुन्हे नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2018 06:07 PM2018-01-05T18:07:33+5:302018-01-05T18:07:48+5:30
जगप्रसिद्ध अशा कळंगुट किनारी भागात मागील एकाच वर्षात अमली पदार्थ विरोधात ३१ गुन्हे नोंद करुन एकूण ३२ जणांना अटक करुन त्यांच्याकडून ३० लाख रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला आहे.
म्हापसा : जगप्रसिद्ध अशा गोव्यातील कळंगुट किनारी भागात मागील एकाच वर्षात अमली पदार्थ विरोधात ३१ गुन्हे नोंद करुन एकूण ३२ जणांना अटक करुन त्यांच्याकडून ३० लाख रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला आहे. त्यापूर्वीच्या तीन वर्षाच्या तुलनेत दुप्पट कामगिरी पोलिसांनी एकाच वर्षात नोंद केली आहे.
कळंगुट पोलिसांनी २०१४ ते २०१६ या तीन वर्षांच्या कालावधीत अमली पदार्थ विरोधात फक्त १६ गुन्हे नोंद केले होते. मात्र संपलेल्या २०१७ च्या वर्षात एकूण ३१ जणांवर गुन्हे नोंद करुन तीन वर्षाचा आकडा मोडीत काढला. नोंद केलेल्या या ३१ गुन्ह्यांत गांजा, चरस, हेरॉईन, कोकेन, एलएसडी, एमडीएमएल सारखे अमली पदार्थ जप्त केले केले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या अमली पदार्थाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ३० लाख रुपयाहून जास्त होत असल्याची माहिती निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिली.
कारवाईत स्थानिक नागरिकांसोबत देश-विदेशातल्या नागरिकांना सुद्धा अटक करण्यात आली आहे. त्यात ८ स्थानिकांचा, ८ विदेशी नागरिकांचा तसेच १६ इतर राज्यातील नागरिकांचा समावेश होता. विदेशी नागरिकात नायजेरियन नागरिकांचा जास्त प्रमाणावर समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या विरोधांत गुन्हेही नोंद करण्यात आले आहेत. अमली पदार्थ विरोधात केलेल्या कारवाईचा एक भाग म्हणून अमली पदार्थांचा साठा करणाºया दोन घरांना सिल सुद्धा ठोठावण्यात आलेला.
कळंगुट पोलिसांच्या कार्यक्षेत्रात येणाºया कांदोळी या किनारी भागातील एका बंगल्याच्या आवारात सुरु असलेल्या गांजाच्या शेतीवर सुद्धा कारवाई करण्यात आली. कारवाईत १० लाख रुपयांचा गांजा ताब्यात घेऊन नंतर तो नष्ट करण्यात आला. गांजाच्या शेतीवर कारवाई करण्याची परिसरातली तसेच वर्षातली सर्वात मोठी कामगिरी कळंगुट पोलिसांनी केली होती.
कळंगुट या किनारी भागातून अमली पदार्थाचे उच्चाटन करण्यास पोलीस कटिबद्ध असल्याचे मत दळवी यांनी व्यक्त केले. या किनारी भागाची व्याप्ती पाहता भागाला भेट देणारे बाहेरील नागरिक या भागात आणून त्याची विक्री करतात. त्यामुळे त्याचा नाहक त्रास स्थानिकांना सहन करवा लागत असल्याचे दळवी म्हणाले. अशा लोकांवर कळंगुट पोलीस बारकाईने लक्ष ठेऊन असल्याचे ते म्हणाले. यावर सर्वत्र जागृती करण्यात येणार असून लोकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन दळवी यांनी केले. या कारवाई सोबत परिसरात बेकायदेशीरपणे वास्तव करुन असलेल्या १६ विदेशी नागरिकांवर सुद्धा कारवाई करुन त्यांना अटक करण्यात आले. यात नायजेरियन, रशियन, कझाकिस्तान नागरिकांचा समावेश आहे.