कामत यांना पाच दिवस दिलासा
By admin | Published: August 15, 2015 02:49 AM2015-08-15T02:49:03+5:302015-08-15T02:49:03+5:30
पणजी : लुईस बर्जर लाच प्रकरणात आमदार दिगंबर कामत यांना पाच दिवस जीवदान मिळाले आहे. भ्रष्टाचाराचे खटले हाताळणाऱ्या येथील विशेष न्यायालयात
पणजी : लुईस बर्जर लाच प्रकरणात आमदार दिगंबर कामत यांना पाच दिवस जीवदान मिळाले आहे. भ्रष्टाचाराचे खटले हाताळणाऱ्या येथील विशेष न्यायालयात त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली असून निवाडा १९ आॅगस्टपर्यंत राखून ठेवण्यात आला आहे. माजी बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव तसेच लुईस बर्जरचे माजी उपाध्यक्ष सत्यकाम मोहंती आणि जैकाचे माजी प्रकल्प संचालक आनंद वाचासुंदर यांच्या जामीन अर्जांवर सोमवार दि. १७ रोजी फैसला होईल. या प्रकरणात पैसे हस्तांतराचे व्यवहार केलेल्या हवाला एजंट रायचंद सोनी याला तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
तब्बल ६ कोटींच्या गाजत असलेल्या या लाच प्रकरणात माजी मुख्यमंत्री कामत हे पोलिसांच्या रडारवर असल्याने संपूर्ण राज्याचे या प्रकरणाकडे लक्ष लागून राहिले आहे. कामत यांच्या वतीने ज्येष्ठ वकील सुरेंद्र देसाई यांनी शुक्रवारी पुढील युक्तिवाद केला.
युक्तिवाद संपविताना कामत यांच्या वकिलांनी न्यायालयाला कळकळीची विनंतीही केली. कोणत्याही अटी घाला, हवे तर आपले अशिल पासपोर्टही जमा करील, राज्याबाहेर जावे लागल्यास पूर्वपरवानगी घेईल; परंतु अटकपूर्व जामीन मंजूर करा, असे अॅड. सुरेंद्र देसाई म्हणाले.
‘जैका’चे माजी प्रकल्प संचालक आनंद वाचासुंदर यांना अटक केल्यानंतर तब्बल सहा दिवसांनी त्यांची जबानी घेतली आहे. वाचासुंदर यांनी ही जबानी पोलिसांच्या सांगण्याप्रमाणे दबावाखाली दिली असल्याच्या संशयास भरपूर वाव आहे, असा युक्तिवाद कामत यांच्या वकिलांनी केला असता, वाचासुंदर हे न्यायालयीन कोठडीत असताना ही जबानी झालेली आहे. तसेच या काळात त्यांना न्यायालयात हजरही करण्यात आले होते. मात्र, त्यांनी कधीच पोलिसांविरुध्द अशा प्रकारची तक्रार केली नाही, असे सरकारी अभियोक्ता गुरुप्रसाद कीर्तनी यांनी न्यायाधीशांच्या निदर्शनास आणले.
दिगंबर कामत आणि चर्चिल आलेमाव यांनी लाच घेतल्याची जी जबानी वाचासुंदर यांनी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिलेली आहे, तसेच अन्य चौघे मिळून पाचजणांनी जी जबानी दिलेली आहे त्यावरच पोलीस कामत यांच्या अटकेसाठी जोर लावत आहेत. लुईस बर्जर कंपनीकडून लाच घेतल्याचा या दोघांवर आरोप आहे. वाचासुंदर तसेच लुईस बर्जरचे माजी उपाध्यक्ष सत्यकाम मोहंती यांनी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिलेली जबानी ही न्यायालयीन कोठडीत गेल्यानंतरच दिलेली आहे याकडे सातत्याने लक्ष वेधण्याचा प्रयत्न शुक्रवारी सुनावणी पुढे चालू ठेवताना कामत यांच्या वकिलाने केला.
कामत आणि चर्चिल यांनी लाच घेतल्याची न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबानी दिलेल्या अन्य तिघांना अजून अटक झालेली नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या पाचही जणांनी सर्वसामान्य स्थितीत जबान्या दिलेल्या नाहीत. या जबान्या स्वेच्छेने दिलेल्या आहेत, असेही म्हणता येणार नसल्याचा दावा देसाई यांनी केला. सरकारी अभियोक्त्याने यास जोरदार आक्षेप घेत न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिलेल्या जबान्या दबावाने किंवा पक्षपाती कशा असू शकतात, असा उलट सवाल केला. पोलीस कोठडीत असताना घेतलेली जबानी एकवेळ दबावाखाली म्हटले असते तर समजता येण्यासारखे होते. न्यायालयीन कोठडीत असताना या सर्व जबान्या झालेल्या आहेत, असे कीर्तनी म्हणाले.
(प्रतिनिधी)