कामत यांची सव्वादोन तास चौकशी, ४0 खाण लिजांना विलंबाची माफी दिल्यावरुन केले अनेक सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 08:14 PM2017-11-24T20:14:26+5:302017-11-24T20:14:26+5:30
खाण घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री तथा मडगांवचे विद्यमान आमदार दिगंबर कामत यांची शुक्रवारी एसआयटी पोलिसांनी सुमारे सव्वा दोन तास चौकशी केली.
पणजी : खाण घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री तथा मडगांवचे विद्यमान आमदार दिगंबर कामत यांची शुक्रवारी एसआयटी पोलिसांनी सुमारे सव्वा दोन तास चौकशी केली. खाण उद्योजक प्रफुल्ल हेदे यांच्या कुळे येथील खाण लिजाच्या बाबतीत तसेच अन्य मिळून ४0 खाण लिजांना दिलेली विलंबाची माफी यासंबंधी पोलिसानी कामत यांना अनेक प्रश्न विचारले.
शुक्रवारी सकाळी ११.१0 च्या सुमारास कामत एसआयटीचे पोलिस निरीक्षक उदय नाईक यांच्यासमोर हजर झाले. दुपारी १.३0 वाजेपर्यंत त्यांची चौकशी चालली. कामत हे २00७ ते २0१२ या काळात मुख्यमंत्री होते. या काळात खाण खातेही त्यांच्याकडेच होते. खात्याचे माजी सचिव राजीव यदुवंशी यांनी न्यायदंडाधिकाºयासमोर दिलेल्या जबानीत कामत यांनी आपली दिशाभूल करुन हे काम करुन घेतल्याची जबानी देऊन कामत यांच्यावरच खापर फोडल्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी कामत यांच्यावर लक्ष केंद्रित केले. येथील विशेष न्यायालयाकडून त्यांना अटकपूर्व अंतरिम जामीन मिळालेला असून पुढील सुनावणी येत्या सोमवार २७ रोजी आहे. पोलिसांना सोमवारपर्यंत आपल्याला म्हणणे मांडावे लागेल. कामत यांची चौकशीसाठी कोठडीत गरज आहे की नाही, हे स्पष्ट करावे लागेल.
यदुवंशी यांनी कामत यांच्यावर खापर फोडल्यानंतर पोलिसांनी कामत यांच्या नातेवाईकांनाही समन्स काढले. त्यांचे पुत्र योगिराज कामत तसेच मेहुणे सतीश लवंदे यांचीही चौकशी करण्यात आली. लवंदे संचालक असलेल्या गणेश इन्फ्रा कंपनीचे व्यवहार संशयास्पद वाटल्याने तसेच या कंपनीचे खाण घोटाळ्याशी संबंध असल्याच्या संशयावरुन चौकशी करण्यात आली.
कामत यांना गेल्या मंगळवारी पोलिसांनी चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी समन्स काढले होते. परंतु प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देऊन ते आले नव्हते. शुक्रवारी ते दाखल झाले. या प्रकरणी खाण उद्योजक प्रफुल्ल हेदे यांना समन्स काढून येत्या मंगळवारी चौकशीसाठी बोलावले आहे. कामत यांच्या जामीन अर्जाबाबत सोमवारपर्यंत न्यायालयात म्हणणे मांडायचे असल्याने पोलिस आता या कामात व्यस्त आहेत.