मनोहर पर्रीकरांविरुद्ध कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून प्रथमच तिखट मारा !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 04:53 PM2017-12-25T16:53:37+5:302017-12-25T16:54:20+5:30
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना देशाच्या विविध भागांतील जनतेमध्ये मान असला तरी, काही विषयांबाबत पर्रीकर हे कायम धक्कादायक, अनाकलनीय आणि एकतर्फी भूमिका घेत असल्याने ते गोवा आणि गोव्याबाहेर टीकेचे धनीही ठरत आहेत.
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना देशाच्या विविध भागांतील जनतेमध्ये मान असला तरी, काही विषयांबाबत पर्रीकर हे कायम धक्कादायक, अनाकलनीय आणि एकतर्फी भूमिका घेत असल्याने ते गोवा आणि गोव्याबाहेर टीकेचे धनीही ठरत आहेत. यावेळी प्रथमच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हादई पाणी तंट्याच्या विषयावरून गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याविरुद्ध जाहीरपणे तिखट मारा चालवला आहे.
पर्रीकर हे संरक्षण मंत्री होते तेव्हा त्यांच्याविषयी देशभरातील विविध प्रसारमाध्यमांमधून ब-या-वाईट अशा सर्व प्रकारच्या चर्चा होत असत. संरक्षणमंत्री असताना पर्रीकर दर शुक्रवारी रात्री दिल्लीहून गोव्यात यायचे व दोन दिवस गोव्यातच राहायचे. यामुळे त्यांना गोव्याचे विकेण्ड सीएम अशी उपाधी आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनी दिली होती. सर्जिकल स्ट्राईकनंतर पर्रीकर यांचे देशात व गोव्यातही कौतुक झाले. मात्र तत्पूर्वी गोव्यात मुख्यमंत्रीपदी असताना पर्रीकर यांनी गोव्यातील कुळ- मुंडकार कायद्यात दुरुस्त्या केल्या व त्या अत्यंत वादग्रस्त ठरल्या. त्यावरून एवढा वाद निर्माण झाला की, त्या सगळ्य़ा दुरुस्त्या पर्रीकर यांना आता मागे घ्याव्या लागल्या आहेत. भाजपाचा 2017 सालच्या विधानसभा निवडणुकीत गोव्यात पराभव झाला, त्यास या वादग्रस्त दुरुस्त्यांचा वाटा मोठा असल्याचे अगदी भाजपाच्या आतिल गोटातही मानले जात आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या समर्थकांनाही तसेच वाटते. पर्रीकर यांनी आता म्हादई पाणीतंटाप्रश्नी अचानक घेतलेल्या धक्कादायक भूमिकेमुळे गोव्याच्या सामाजिक, राजकीय आणि पर्यावरण क्षेत्रतील मान्यवरांनी पर्रीकर यांना टीकेचे लक्ष्य बनविले आहे. सोशल मीडियावरून गोव्यात सध्या पर्रीकर यांच्याविरुद्ध आता जेवढी टीका होत आहे, तेवढी ती यापूर्वी कधीच झालेली नाही. गेली पंधरा वर्षे गोव्याने म्हादई नदीचे पाणी कर्नाटकला देण्यास गोवा सरकारने आणि गोव्यातील लोकांनी विरोध केला. पाणीप्रश्न लवादासमोर असल्याने तिथेच काय तो सोक्षमोक्ष लागू द्या, अशी भूमिका गोवा सरकारने व गोव्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी कायम घेतली होती. मात्र पर्रीकर यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर पिण्याचे पाणी कर्नाटकला देणे आम्हाला तत्त्वत: मान्य असल्याचे जाहीर करत त्याविषयीच्या चर्चेसाठी येडीयुरप्पा यांना पत्रही दिले. यामुळे गोव्यातील सामाजिक क्षेत्र ढवळून निघाले आहे. गोव्याचे पर्यावरणतज्ज्ञ डॉ. नंदकुमार कामत, म्हादईच्या विषयाचे अभ्यासक राजेंद्र केरकर यांच्यासह अनेकांनी पर्रीकर यांच्या या भूमिकेला तीव्र आक्षेप घेतला आहे. गोवा सरकारने म्हादईसाठीच्या कायदेशीर लढाईसाठी आतापर्यंत पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला आहे.
कर्नाटकमधील भाजपाचे कार्यकर्ते व समर्थक पर्रीकर यांच्या भूमिकेचे स्वागत करत आहेत. मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पर्रीकर यांच्याविरुद्ध टीका चालवली आहे. पर्रीकर हे जर खरोखर कर्नाटकला म्हादईचे पाणी देण्यास तयार असतील तर त्यांनी आपल्याशी चर्चेसाठी यावे, ते येडीयुरप्पा यांना (जे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत) पत्र देतात व म्हादईप्रश्नी मोठे नाटक करू पाहत आहेत, अशी टीका सिद्धरामय्या यांनी केली आहे. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुका येत्या वर्षी होत असल्याने येडीयुरप्पा व पर्रीकर हे मिळून उत्तर कर्नाटकमधील मतदारांवर छाप टाकण्यासाठी नाटक रचू पाहत असल्याचे सिद्धरामय्या आणि कर्नाटकमधील काँग्रेसच्या अन्य नेत्यांना वाटते. गोव्यातील काँग्रेसचे नेते शांताराम नाईक, आलेक्स रेजिनाल्ड लारेन्स, गिरीश चोडणकर व इतरांनाही तसेच वाटते. त्यांनीही पर्रीकर यांच्याविरुद्ध टीका चालवली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी म्हादईचे पाणी कर्नाटकला दिलेले नाही, मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकच्या निवडणुकीनंतर चर्चेस तयार आहोत, एवढीच भूमिका घेतली असल्याचे गोव्यातील भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. सोशल मीडियावर सध्या पर्रीकर समर्थकांनी गोवा सरकारची भूमिका नेटीझन्सना पटवून देण्याचा प्रयत्न चालवला आहे. गोव्यात काँग्रेसचे सरकार असताना काँग्रेसच्या काही मुख्यमंत्र्यांनी व नेत्यांनीही कर्नाटकला पाणी देण्याची तयारी दाखवली होती व तशी पत्रेही दिली होती, असे पर्रीकर यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.