कर्नाटकचे मुख्यमंत्री 16-17 सप्टेंबर रोजी गोव्यात, म्हादईप्रश्नी चर्चेस इच्छुक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 07:58 PM2019-09-10T19:58:01+5:302019-09-10T19:58:56+5:30
कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा हे 16 किंवा 17 रोजी गोवा भेटीवर येणार आहेत.
पणजी - म्हादई पाणीप्रश्नी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा हे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी खूप इच्छुक झाले आहेत. येत्या 16 किंवा 17 रोजी येडीयुरप्पा गोवा भेटीवर येणार आहेत. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून पाणीप्रश्नी ते चर्चा करतील. स्वत: येडीयुरप्पा यांनी याविषयीचे विधान मंगळवारी बंगळुरूमध्ये केले व त्यामुळे गोव्यात चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
म्हादई पाणीप्रश्नी पाणी तंटा लवादाने यापूर्वी निवाडा दिला आहे. तो निवाडा कर्नाटकला मान्य नाही. यामुळे विषय सर्वोच्च न्यायलायत पोहचला आहे. कर्नाटकने निवाडय़ाविषयी लवादाकडेही काही स्पष्टीकरणो मागितली आहेत. तथापि, केंद्रीय खाण मंत्री तथा कर्नाटकचे एक नेते प्रल्हाद जोशी हे सोमवारी गोव्यात होते. त्यांनी म्हादईप्रश्नी गोवा व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून तोडगा काढावा असे म्हटले होते. जोशी यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचीही सोमवारी भेट घेतली होती.
या सगळ्य़ा पार्श्वभूमीवर येडीयुरप्पा मंगळवारी म्हादईप्रनी बोलले. आपल्या कार्यालयाने मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. आपल्याला गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत म्हादई पाणीप्रश्नी बोलायचे आहे, असे येडीयुरप्पा म्हणाले. म्हादई नदीचा एक प्रवाह काही प्रमाणात महाराष्ट्रातील सिंधुदुर्गमधूनही जातो. आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही नुकतेच भेटून म्हादईप्रनी बोललो आहे. येत्या 16 व 17 रोजी गोव्याला भेट देण्याचा माझा विचार आहे.
दरम्यान, म्हादई पाणीप्रश्नी कर्नाटकशी चर्चा करू नये, कारण लवादाने अगोदरच निवाडा दिला आहे, अशी अनेक गोमंतकीयांची भूमिका आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनीही पुन्हा मंगळवारी अशीच भूमिका मांडली. गोव्याचे मुख्यमंत्री सावंत हे गोव्याच्या हिताच्यादृष्टीने वागतील अशी आपण आशा ठेवतो, असे कामत म्हणाले. लवादाने अगोदरच निवाडा दिल्याने आता चर्चेला वावच नाही, असे कामत म्हणाले.