म्हादईसाठी कर्नाटकातील नेते एकवटले; सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींची भेट घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 09:19 AM2023-08-24T09:19:37+5:302023-08-24T09:19:54+5:30
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरुमध्ये सर्वपक्षीय बैठकीनंतर ही माहिती प्रसार माध्यमांना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी :कर्नाटकला कणकुंबी येथे म्हादई नदीवर कळसा, भंडुरा प्रकल्पाचे काम कोणत्याही परिस्थितीत सुरु करायचे आहे. त्यामुळे आता सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीला नेले जाणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी
बंगळुरुमध्ये सर्वपक्षीय बैठकीनंतर ही माहिती प्रसार माध्यमांना दिली.
कळसा, भंडुरा प्रकल्पासाठी डीपीआरला पर्यावरणीय तसेच अन्य परवाने लागतील ते मिळवण्यासाठी कर्नाटकचा खटाटोप चालला आहे. डीपीआरला केंद्रीय जल आयोगाने याआधीच मंजुरी दिलेली आहे. कर्नाटकला पाण्याची कशी गरज आहे हे पंतप्रधानांना पटवून देण्याचा प्रयत्न शिष्टमंडळ करील, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले. कर्नाटकचा म्हादईवरुन केवळ गोव्याशीच वाद नाही तर शेजारी तामिळनाडूकडे कावेरीच्या पाण्यावरुनही वाद आहे.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गोवा सरकारला तीन महिन्यात म्हादई अभयारण्य राखीव व्याघ्र क्षेत्र म्हणून अधिसूचित करण्याचे आदेश दिले आहेत. राखीव व्याघ्रक्षेत्र अधिसूचित झाल्यास कर्नाटकसमोर आणखी अडचणी निर्माण होणार आहेत.