कारसेवकांना प्राधान्याने अयोध्या दर्शन घडविणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2024 10:21 AM2024-01-22T10:21:00+5:302024-01-22T10:22:17+5:30
मडगाव येथे कारसेवकांचा सत्कार.
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : अयोध्या नगरीत जाऊन श्रीरामांचे दर्शन सर्वप्रथम ज्यांना घ्यायचे आहे त्यांना आणि खास करून कारसेवकांना पाठविण्याची व्यवस्था सरकारकडून केली जाईल. कारसेवकांना याबाबतीत पहिला मान असून, त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यांच्यासाठी आवश्यक व्यवस्था सरकारकडून करण्यात येईल. त्यानंतर मुख्यमंत्री देवदर्शन यात्रेतर्गत ज्या साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घ्यायचे आहे त्यांनाही तो योग चालून येईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शनिवारी मडगावमधील कार्यक्रमात बोलताना जाहीर केले.
जे कारसेवक एकदा नव्हे तर दोनदा आपल्या प्राणांची बाजी लावून कारसेवेत सहभागी झाले, ज्यांनी ढाचा पाडला आणि त्यावेळी खऱ्या अर्थाने श्रीराम मंदिर बांधले म्हणून आज प्रतिष्ठापना करणे शक्य होत आहे. या कारसेवकांचा सत्कार करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य समजतो. त्यावेळी आम्ही काही कारसेवेत सहभागी होऊ शकलो नव्हतो. मात्र, कारसेवकांचा सत्कार करण्यास मिळणे हे देखील भाग्य आहे, असे सावंत यावेळी म्हणाले.
माहिती आणि प्रसिद्धी खाते आणि रवींद्र भवन, मडगाव यांच्यातर्फे श्रीराम मंदिर पुनर्निर्माण आणि मूर्ती प्रतिष्ठापना आनंदोत्सवानिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्या अंतर्गत शनिवारी सायंकाळी स्वरवैभव क्रिएशन्स प्रस्तुत 'गदिमा' विरचित आणि 'बाबूजी' स्वररचित 'गीत रामायण' हा गीत गायनाचा कार्यक्रम झाला.
यावेळी माजी खासदार विनय तेंडुलकर, नरेंद्र सावईकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, आमदार दिगंबर कामत, माजी आमदार दामू नाईक, आमदार उल्हास तुयेकर, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, सदस्य सचिव आग्नेलो फर्नाडिस तसेच नगरसेवक उपस्थित होते. यावेळी कारसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.