हजारो धोंडांनी साकारले अग्निदिव्य; शिरगावात कौलोत्सवास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2024 10:49 AM2024-05-14T10:49:46+5:302024-05-14T10:49:54+5:30
भाविकांची अमाप गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: शिरगाव येथे लईराई जत्रोत्सवात संपूर्ण दिवस भाविकांचा महापूर दिसून आला. मध्यरात्री हजारो व्रतस्थ धोंडांनी रखरखत्या निखाऱ्यातून अनवाणी अग्निदिव्य साकारले.
हा सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी सभोवताली उपस्थिती लावली होती. पहाटेपर्यंत हे अग्नीदिव्य सुरू होते. त्यानंतर देवीने अग्निदिव्य साकारल्यानंतर सांगता झाली.
भाविक घेणार देवदर्शन
सोमवारी सकाळपासून कौल घेण्यास सुरुवात झालेली असून आगामी चार दिवस शिरगाव येथील घरोघरी देवीचे आगमन होणार असून यानिमित्त लाखो भाविक आगामी चार दिवसात शिरगावात उपस्थिती लावून देवदर्शन घेणार आहेत.
रविवारी रात्री अचानक पावसाने हजेरी लावल्याने या ठिकाणी भरलेल्या फेरीला तसेच भक्तांना काहीसा त्रास सहन करावा लागला, संपूर्ण दिवस तसेच मध्यरात्री व पहाटेपर्यंत भाविकांची तोबा गर्दी शिरगावात दिसून आली. प्रशासनाने सर्व प्रकारची व्यवस्था करताना वाहतूक व्यवस्था तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात चोख भूमिका बजावली.
विलक्षण अनुभव
पहिल्यांदाच धोंड म्हणून सेवा देणारे श्लोक भगवान हरमलकर या युवकाने अग्निदिव्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, हा अनुभव विलक्षण होता. देवीच्या कृपेमुळेच अशा प्रकारचे धाडस करण्याची किमया साधू शकल्याचेही त्याने सांगितले. आगामी चार दिवस मोठी गर्दी या ठिकाणी होणार असून गुरुवारी सायंकाळी देवी मंदिरात गेल्यानंतर या महाजत्रोत्सवाची यशस्वी सांगता होणार आहे, असे त्यांनी सांगितले.