गोव्यातील त्या रुग्णाबाबतचा निपाहविषयक संशय चाचणीअंती दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2018 12:31 PM2018-05-30T12:31:02+5:302018-05-30T12:31:02+5:30
केरळहून गोव्यात आलेल्या संशयित निपाह रुग्णाचा संशय दूर झाला आहे.
पणजी : केरळहून गोव्यात आलेल्या संशयित निपाह रुग्णाचा संशय दूर झाला आहे. गेल्या सोमवारी केरळहून रेल्वेमार्गे येऊन नंतर गोव्यातील बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळात (गोमेकॉ) दाखल झालेल्या या रुग्णाबाबतची महत्त्वपूर्ण चाचणी पुणे येथे झाली. या चाचणीद्वारे रुग्णाचा निपाहविषयक संशय दूर झाला आहे. केरळमध्ये अनेकांचे बळी घेतलेल्या निपाह विषाणूची लागण या रुग्णाला झालेली नाही हे चाचणीअंती स्पष्ट झाल्यामुळे गोमेकॉ इस्पितळानेही सुटकेचा श्वास घेतला आहे व गोवा प्रशासनानंही सुटकेचा निश्वास सोडला आहे.
गोवा हे पर्यटन राज्य असल्याने आरोग्य खात्याच्या यंत्रणोने खबरदारी घेतलेली आहे. केंद्र सरकारने गोव्याला निपाहबाबत काळजी घेण्यासाठी अंतरिम मार्गदर्शक तत्त्वेही पाठवून दिली आहेत. केरळमधील थंड हवेच्या ठिकाणी गोव्यातील शेकडो लोक अलिकडे सुट्टी घालविण्यासाठी गेले होते. निपाह विषाणूची लागण झाल्याचे कोणते सिम्पटम्स असतात याविषयी गोवा सरकारने माहिती जारी केली होती. गेल्या सोमवारी एका रुग्णाला अस्वस्थ वाटू लागले. तो केरळहून रेल्वेने आला व बार्देश तालुक्यातील थिवी रेल्वे स्थानकावर उतरला आणि मग बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात दाखल झाला. त्याला स्वत:ला निपाहचा संशय वाटू लागला होता. डॉक्टरांनी त्याला क्वारंटाईनध्ये ठेवले. तज्ज्ञ डॉक्टरांची त्याच्यावर देखरेख होती. त्याच्या रक्ताचा अहवाल आल्याशिवाय नेमकेपणाने काही सांगता येत नाही असे डॉक्टरांचे म्हणणो होते. तो निपाहचा संशयित रुग्ण मानून काळजी घेतली जात होती. त्याच्या रक्ताचे नमूने सोमवारीच सायंकाळी पुणे येथे पाठविण्यात आले. मंगळवारी रात्री उशिरा ईमेलद्वारे त्याबाबतचा अहवाल आला. त्याला निपाहची लागण झालेली नाही असे स्पष्ट झाले. यामुळे गोवा राज्य निपाह विषाणूच्या संसर्गापासून दूर असल्याचेही स्पष्ट झाल्याने येथील पर्यटन व्यवसायाशीनिगडीत घटकांनीही समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान, आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले, की या रुग्णाच्या चाचणीविषयी कोणता अहवाल येतो याकडे आम्हा सर्वाचेच लक्ष लागून होते. अहवाल निगेटीव्ह यावा अशी आमची इच्छा होतीच. मॉलेक्युलर व सरोलॉजीकल मेथडनुसार अहवाल निगेटीव्ह आला आहे. गोव्याच्यादृष्टीने ही चांगली गोष्ट आहे.