केपेत कामगाराचा खून?
By admin | Published: May 9, 2015 02:22 AM2015-05-09T02:22:10+5:302015-05-09T02:22:20+5:30
केपे : शिरवई-केपे येथील सोमेश्वर मंदिरामागे एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला असून केपे पोलिसांनी या प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.
केपे : शिरवई-केपे येथील सोमेश्वर मंदिरामागे एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला असून केपे पोलिसांनी या प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. एका अर्धवट बांधकामाच्या सोकपिटच्या खड्ड्यात हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला.
मिळालेल्या माहितीप्रमाणे, या जागेत टाईल्स फिटिंग करणारा हुबळी येथील कामगार झकीर खान राहात होता. काही दिवसांपूर्वी त्याच्याकडे त्याचा मित्र शहानूर हा आला होता. मंगळवारी या दोघांत दारू पिऊन भांडण झाले होते. सध्या या दोन्ही व्यक्ती बेपत्ता आहेत. सापडलेला मृतदेह ओळख पटविण्यापलीकडे असल्याने हा मृतदेह झकीरचा की शहानूरचा, हे कळणे कठीण झाले आहे.
केपे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, झकीर खान आपली पत्नी व मुलासह या जागेत राहात होता. मात्र, पत्नीशी त्याचे पटत नसल्यामुळे काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी दुसरीकडे राहायला गेली होती. दरम्यानच्या काळात त्याचा मित्र त्याच्याकडे राहायला आला होता. या दोघांनाही दारूचे व्यसन होते.
शुक्रवारी संध्याकाळी या जागेत दुर्गंधी सुटल्यामुळे झकीरच्या पत्नीला बोलविण्यात आले. सोकपिटच्या खड्ड्याजवळ माशा घोंगावत असल्यामुळे तेथील माती काढून पाहिले असता, आत एक पुरुषाचा मृतदेह दिसून आला. केपे पोलिसांनी सध्या अज्ञात व्यक्तीचा खून झाल्याचा गुन्हा नोंदविला आहे. केपेचे पोलीस निरीक्षक प्रवीण गावस पुढील तपास करत आहेत. (प्रतिनिधी)
गुन्हा नोंद : दारूच्या नशेत झाले होते भांडण