म्हापसा नगरपालिकेच्या बैठकीत खडाजंगी; वाद नियंत्रणात येत नसल्याने बैठक सोडण्याचेही आदेश
By काशिराम म्हांबरे | Published: November 22, 2023 06:19 PM2023-11-22T18:19:58+5:302023-11-22T18:29:09+5:30
नगराध्यक्षांनी एका नगरसेवकाला बैठक सोडून जाण्याची सूचना केली होती
म्हापसा, काशिराम म्हांबरे: नगराध्यक्षा तसेच नगरसेवकातील खडाजंगीत संपन्न झालेल्या म्हापसा नगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत हंगामी कामगारांच्या पगार वाढिच्या मुद्यासोबत औद्योगीत वसाहतीतील कचऱ्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. मागील आठवड्यात बैठकीच्या नोटिशीच्या मुद्यावरून स्थगित ठेवण्यात आलेली नगरपालिकेची बैठक आज बुधवारी पालिकेच्या सभागृहात नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी बैठकीच्या पटालावर असलेल्या विविध मुद्यावरील चर्चेदरम्यान नगरसेवक तसेच नगराध्यक्षांनी आक्रमक भूमिका घेतल्याने बऱ्याच वेळी शाब्दिक वाद होताना दिसून आले. होत असलेले वाद विकोपालाही जात होते. वादावर नियंत्रणात येत नसल्याने नगराध्यक्षांनी एका नगरसेवकाला बैठक सोडून जाण्याची सुचनाही केली होती.
पालिकेतील विविध पदावर हंगामी सेवा पुरवणाऱ्या सुमारे १२२ कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर निर्णय घेताना कर्मचाऱ्यांनी नागरिकांना तसेच नगरसेवकांनी चांगली सेवा पुरवावी असेही नगरसेवकांकडून सुचीत करण्यात आले. थिवी औद्योगीक वसाहतीतून गोळा होणाऱ्या कचऱ्यावर लागू करण्यात आलेल्या करावर फेरविचार व्हावा असे प्रस्ताव तेथील समितीने पालिकेला पाठवला होता. लागू करण्यात आलेला कर लहान कंपन्यांवर अन्यायकारक असल्याने फेरविचाराची मागणी करण्यात आलेली. या औद्योगिक वसाहतीचा पालिकेला थेट लाभ होत नसल्याने प्रस्तावावर पुढील बैठकीत चर्चा केली जाणार आहे. या दरम्यान पालीका तसेच तेथील मंडळात चर्चा केली जाणार आहे.