खोतीगाव अभयारण्य बनले उर्राक तस्करीचे मुख्य केंद्र; स्थानिकांना चकवा देण्यासाठी नवा मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 05:26 PM2020-04-12T17:26:59+5:302020-04-12T17:27:13+5:30
कर्नाटक राज्याच्या अगदी सीमेवर असलेल्या मार्ले या गावातून ही तस्करी केली जाते. त्यासाठी जंगली पायवाटांचा वापर केला जातो.
मडगाव: जंगली जनावरांना मुक्त संचार करण्यासाठी राखीव ठेवलेले कोणकोणचे खोतीगाव अभयारण्य क्षेत्र सध्या उर्राक तस्करीसाठी मुक्त केंद्र बनले असून याच जंगली मार्गाने मोठ्या प्रमाणावर गोव्यातील उर्राक शेजारच्या कर्नाटक राज्यात जाऊ लागले आहे.
उर्राक ही गोव्यातील मौसमी दारु असून याच उन्हाळी महिन्यात ती गाळली जाते. काजू पासून तयार केली जाणारी ही दारू काजू फेणीचा पहिला टप्पा मानला जातो. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे देशी बनावटीची विदेशी दारु कुठेही मिळत नसल्याने कर्नाटकात गोव्याच्या या उर्राकला मागणी आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार , कर्नाटक राज्याच्या अगदी सीमेवर असलेल्या मार्ले या गावातून ही तस्करी केली जाते. त्यासाठी जंगली पायवाटांचा वापर केला जातो.
ही तस्करी रोखण्यासाठी वन अधिकारी आणि स्थानिकांनी आपल्यापरीने प्रयत्न करूनही त्यांना ती रोखण्यात यश आलेले नाही. या तस्करांच्या नेहमीच्या वाटा अडविल्या तरी ते दुसऱ्या वाटा शोधून काढून आपला कार्यभाग साधत आहेत. एका स्थानिकाने सांगितले, आम्ही नेहमीच्या वाटेवर दगड टाकून ती बंद करूनही ही तस्करी थांबलेली नाही. हे तस्कर रात्रीच्या वेळी नव्या वाटा शोधू लागले आहेत. त्यामुळे या तस्करीवर अंकुश ठेवणे कठीण झाले आहे. काणकोणात लोक मोठ्या प्रमाणात उर्राक गाळत असून यातील बहुतेक उर्राक कर्नाटकातच विकला जातो अशी माहिती मिळाली आहे.