कुडतरीतील अपहृत विद्यार्थिनी आसाममध्ये
By admin | Published: September 9, 2015 02:12 AM2015-09-09T02:12:32+5:302015-09-09T02:13:57+5:30
मडगाव : एका आठवड्यापूर्वी लोटली येथून अपहरण करण्यात आलेली ११ वर्षीय शालेय विद्यार्थिनी आसाम राज्यात सापडली. या
मडगाव : एका आठवड्यापूर्वी लोटली येथून अपहरण करण्यात आलेली ११ वर्षीय शालेय विद्यार्थिनी आसाम राज्यात सापडली. या विद्यार्थिनीच्या अपहरण प्रकरणात सहभागी असलेल्या तिघा सुरक्षा रक्षकांना आसाम पोलिसांनी अटक केली आहे. अपहृत मुलगी आणि आरोपींना ताब्यात घेण्यासाठी मायणा-कुडतरी पोलिसांचे दहा जणांचे पथक सध्या आसामला रवाना झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मायणा-कुडतरी पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक अक्षय पालयेकर व साहाय्यक उपनिरीक्षक रोहिदास वेळीप यांच्यासह अन्य आठ पोलीस या मोहिमेवर गेले असून येत्या दोन दिवसांत ते आरोपींना घेऊन गोव्यात येतील. गोव्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करण्यासाठी आलेल्या या तीन संशयितांनी या विद्यार्थिनीचे अपहरण केल्याचा आरोप आहे. शाळेच्या कार्यक्रमाला जाते असे सांगून सकाळी बाहेर पडलेली ही मुलगी सायंकाळी परत न आल्यामुळे दुसऱ्या दिवशी तिच्या पालकांनी मायणा-कुडतरी पोलीस स्थानकात तक्रार केली होती. दरम्यान, जानेवारी ते आॅगस्ट या आठ महिन्यांत दक्षिण गोव्यात एकूण २९ अपहरणाच्या घटना घडल्या असून त्यापैकी २५ घटनांचा तपास लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. यातील गंभीर अशी गोष्ट म्हणजे अपहरण करण्यात आलेल्या २९ घटनांपैकी ११ घटनांत अल्पवयीन शालेय विद्यार्थिनींचा समावेश आहे.
वास्को पोलीस स्थानकात सर्वात अधिक म्हणजे ७ अपहरणाचे गुन्हे नोंद आहेत.
मडगाव पोलीस ठाण्यात पाच, वेर्णा पोलीस ठाण्यात चार, मायणा-कुडतरी, कोलवा व फोंडा येथे प्रत्येकी तीन, केपे पोलीस स्थानकात दोन, तर कुडचडे पोलीस स्थानकात एका घटनेची नोंद झालेली आहे. (प्रतिनिधी)