पणजी- दीड वर्षांनंतर गोमेकॉत झाले मूत्रपिंडरोपण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2018 10:18 PM2018-03-10T22:18:05+5:302018-03-10T22:18:05+5:30
दीड वर्षांनंतर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पुन्हा एकदा मूत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली.
पणजी: दीड वर्षांनंतर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पुन्हा एकदा मूत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. आईकडून मुलाला मूत्रपिंड देण्याची ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्याची माहिती गोमेकॉकडून देण्यात आली.
गोमेकॉत शनिवारी मूत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया युरोलोजी विभागाचे प्रमुख डॉ मधुमोहन प्रभुदेसाई आणि नेफ्रोलोजी विभागाचे प्रमुख डॉ जे पी तिवारी यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे करण्यात आली. डिचोली येथील एका २२ वर्षीय युवकावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. युवकाचे मूत्रपिंड निकामी झाले असल्यामुळे त्याच्या आईकडून त्याला एक मूत्रपिंड देण्यात आले. गोमेकॉतील ही १५ वी मूत्रपिंडरोपण शस्त्रक्रिया ठरली आहे. १५ ऑक्टोबर २०११ रोजी गोमेकॉत पहिली मूत्रपिंड शस्त्रक्रिया करण्यात आली. एकूण गोमेकॉत मूत्रपिंडरोपणाच्या १४ शस्त्रक्रिया झाल्या होत्या. परंतु त्यानंतर नेफ्रोलोजी विभागाचे प्रमुख डॉ जे पी तिवारी हे गोमेकॉच्या सेवेतून दीर्घ रजेवर गेल्यामुळे हा विभागच अपंग झाला होता. नेफ्रोलोजी विभाग सक्रिय नसेल तर मूत्रपिंडरोपण शस्त्रक्रिया केल्या जात नाहीत, कारण मूत्रपिंड शस्त्रक्रियेनंतर ते मूत्रपिंड सक्रीय होईपर्यंत निगा राखण्याची मोठी जबाबदारी ही नेफ्रोलोजी विभागाची असते. त्यामुळे मूत्रपिंड रोपण शस्त्रक्रिया पूर्णपणे थांबविण्यात आल्या होत्या. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या प्रयत्नाने नंतर डॉ तिवारी यांना पुन्हा गोमेकॉत आणण्यात यश मिळाल्यानंतर मूत्रपिंडरोपण शस्त्रक्रिया विभाग पुन्हा सक्रिय करण्यात आला. शनिवारी एक शस्त्रक्रिया झाली आणि रविवारीही एक शस्त्रक्रिया होणार आहे. रविवारच्या शस्त्रक्रियेसाठीही आईकडून मुलाला मूत्रपिंड दान दिले जाणार आहे.
बॉम्बे इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्समधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने गोमेकॉतील मूत्रपिंड शस्त्रक्रिया विभाग सुरू आहे. शनिवारी १५ वी शस्त्रक्रियाही इन्स्टिट्युटचे ज्येष्ठ युरोलोजिस्ट आणि मूत्रपिंड रोपण तज्ज्ञ डॉ उमेश ओझा आणि डॉ सदानंद थत्ते यांच्या उपस्थितीत झाली. डॉ ओझा आणि डॉ थत्ते हे डॉ मधुमोहन यांचे शिक्षकही आहेत.