धक्कादायक! गोव्यात धारबंदोडा येथे मेलेल्या कोंबड्या थेट नदीत टाकल्या, स्थानिकांचा संताप
By आप्पा बुवा | Published: June 19, 2024 05:07 PM2024-06-19T17:07:46+5:302024-06-19T17:08:38+5:30
धारबांदोधा येथील नदीपात्रात एका पोल्ट्री फार्मने मेलेल्या कोंबड्या आणून टाकल्याने पसरली दुर्गंधी
अप्पा बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: धारबांदोधा येथील नदीपात्रात एका पोल्ट्री फार्मने मेलेल्या कोंबड्या आणून टाकल्याने दुर्गंधी पसरली असून, स्थानिकांनी या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सविस्तर वृत्तानुसार बोटणे धारबंदवाडा येथील नदीचे पाणी थेट खालच्या भागात लोक पिण्यासाठी व अन्य कामासाठी वापरतात. हेच पाणी नंतर दूध सागर नदीच्या माध्यमातून ओपा पाणी प्रक्रिया प्रकल्पाला जाऊन मिळते. सदर नदीत मोठ्या प्रमाणावर मेलेल्या मृत कोंबड्या रात्री कुणीतरी आणून टाकल्या. यापूर्वी सुद्धा असा प्रकार झाला होता. जवळच असलेल्या एका पोल्ट्री फार्मने सदर कोंबड्या टाकल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. यावेळी मात्र लोकांनी लेखी तक्रार ग्रामपंचायत कार्यालयाला दिली. तक्रारीला अनुसरून सरपंच बालाजी गावस यानी स्थानिक पंच व इतर पंचासह नदीपत्राची पाहणी केली असता त्यांना कोंबड्या भरलेल्या पिशव्या आढळून आल्या.
या संदर्भात अधिक बोलताना सरपंच बालाजी गावस म्हणाले की सदरचा प्रकार हा काही नवीन नाही. इथल्या एका पोल्ट्री फार्मला यासंबंधी ताकीद सुद्धा देण्यात आली आहे. ह्या कोंबड्या नक्की कोणी आणून टाकल्या याचा सुद्धा आम्ही तपास नक्की करू. या विषयी पोलिसात तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली असून पोलिसांनी येथे येऊन पाहणी केली आहे. सध्या ठीक ठिकाणी बर्ड फ्लू चा प्रादुर्भाव असल्याने सरकारने या घटनेची त्वरित दखल घ्यावी व जो कोणी दोषी आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी.