गोव्यातील कोलवा बीच आता होणार ‘आदर्श पर्यटन स्थळ’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 05:31 PM2018-03-13T17:31:28+5:302018-03-13T17:31:28+5:30
पर्यटकांसाठी अत्यंत सुरक्षित मानला गेलेला आणि आपल्या रुपेरी वाळूसाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यातील कोलवा समुद्र किना-याचा आता ‘आदर्श पर्यटनस्थळ’ म्हणून विकास केला जाणार आहे. महत्वाची बाब म्हणजे ताजमहाल, काझीरंगा आणि सोमनाथ मंदिराच्या बरोबरीने आता कोलव्याचाही विकास केला जाणार आहे.
- सुशांत कुंकळयेकर
मडगाव : पर्यटकांसाठी अत्यंत सुरक्षित मानला गेलेला आणि आपल्या रुपेरी वाळूसाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यातील कोलवा समुद्र किना-याचा आता ‘आदर्श पर्यटनस्थळ’ म्हणून विकास केला जाणार आहे. महत्वाची बाब म्हणजे ताजमहाल, काझीरंगा आणि सोमनाथ मंदिराच्या बरोबरीने आता कोलव्याचाही विकास केला जाणार आहे.
मडगावपासून अवघ्या सात कि.मी. अंतरावर असलेला हा समुद्र किनारा आपल्या निळ्याभोर पाण्यासाठी आणि तटावर असलेल्या पांढ:याशुभ्र वाळूसाठी प्रसिद्ध आहे. या किना:याची खासियत म्हणजे, या रुपेरी वाळूत कुठेही खडकाळ जागा आड येत नाही त्यामुळे देशी व विदेशी पर्यटकांच्या पसंतीचा किनारा म्हणून तो प्रसिद्ध आहे. या किना:याची महती संपूर्ण जगात पोहोचली आहे.
सध्या नवी दिल्लीत चालू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात केंद्रीय पर्यटनमंत्री के.एस. आफोन्स यांनी लोकसभेत सोमवारी ही माहिती दिली. यासाठी चालू अर्थसंकल्पात विशेष निधीची तरतूदही केल्याचे सांगण्यात आले. पर्यटन स्थळांची आणखी विकसित करण्याची क्षमता, सोप्यारितीने विकास कार्यक्रम पूर्ण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा विकास हाती घेण्याचे ठरविले आहे. यातील आणखी एक मुद्दा म्हणजे, फुटबॉलचे आकर्षण हाही आहे.
आदर्श पर्यटनस्थळ कार्यक्रमाखाली उत्तर प्रदेशातील ताजमहाल आणि फतेहपूर सिक्री, महाराष्ट्रातील अजंठा आणि एलोरा, नवी दिल्लीतील हुमायूची कबर, कुतूबमिनार व लाल किल्ला आणि गोव्यातील कोलवा बीचचा समावेश आहे.
केंद्राकडून लक्ष केंद्रीत करण्यात आलेले इतर पर्यटन स्थळांमध्ये राजस्थानचा अमेर किल्ला, गुजरातमधील सोमनाथ व धोलवारिया, मध्यप्रदेशमधील खजुराहो, कर्नाटकामधील हंपी, तामीळनाडूमधील महाबळीपुरम, आसाममधील काझीरंगा, केरळमधील कुमारकोम व बिहारमधील महाबोधी मंदिराचा समावेश आहे. सध्या पर्यटन मंत्रलयातर्फे हाती घेतलेल्या स्वदेश दर्शन या योजनेखाली हा विकास केला जाणार आहे.
आदर्श पर्यटनस्थळ या योजनेखाली वरील स्थळांचा साधनसुविधाच्या दृष्टीतून विकास करण्याबरोबरच या स्थळांचे ब्रँडींग व मार्केटींग हाती घेण्यात येणार आहे. या योजनेत खासगी गुंतवणूकदारांना समाविष्ट केला जाईल असे आफोन्स यांनी म्हटले आहे.