कोल्हापुरातील पुराचा गोवा डेअरीला फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 01:03 PM2019-08-14T13:03:16+5:302019-08-14T13:07:52+5:30
गोवा डेअरीला कोल्हापूर, बंगळुरुहून टँकरव्दारे येणारे दूध गेले आठ दिवस येऊ शकलेले नाही.
पणजी - गोवा डेअरीत कोल्हापूर, बंगळुरुहून टँकरद्वारे येणारे दूध गेले आठ दिवस येऊ शकलेले नाही. सुमारे २५ हजार लिटर दूध या दोन ठिकाणाहून गोवा डेअरीला येते. त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. कोल्हापूरातील पुराचा असा फटका गोवा डेअरीलाही बसला आहे.
डेअरीच्या व्यवस्थापकीय संचालक राधिका काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, ‘स्थिती पूर्वपदावर यायला आणखी दोन दिवस तरी लागतील. कोल्हापूर भागात पुरामुळे अनेक दुभती जनावरे मृत झालेली आहेत. कोल्हापूर सहकारी दूध उत्पादक संघाच्या डेअरीमध्ये पाणीही उपलब्ध नाही. सध्या गोवा डेअरीत ४५ हजार लिटर दूध उत्पादन होते. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) १५ हजार लिटरचा एक टँकर रोज येत होता. पुरामुळे मागील काही दिवस तो बंद आहे. बंगळुरुहून येणारा दुधाचा टँकरही हुबळीजवळ रस्ता बंद झाल्याने येऊ शकलेला नाही. कोल्हापूरहून येणारे दूध गाईचे तर बंगळुरूहून येणारे म्हशीचे असते. कोल्हापुरात पुरामुळे शेतकऱ्यांना विस्थापित व्हावे लागले आहे.
घाट प्रदेशातील पूर ओसरल्याने पुढील एक दोन दिवसात टँकरची वाहतूक सुरळीत होईल, असा दावा केला जात आहे. याशिवाय गोव्यातही काही भागांमध्येही गेल्या काही दिवसांत पूरस्थिती निर्माण झाल्याने स्थानिक दूध संकलन घटले आहे. डिचोली तालुक्यातील साळ तसेच पेडणे तालुक्यातील इब्रामपूर, हळर्ण, तळर्ण भागातूनही दूध संकलन होऊ शकलेले नाही. १५ हजार लिटर दूध याच भागातून डेअरीला मिळत होते. गोवा डेअरीने पूर्वीचा साठा या काळात हातावेगळा केला.
घाटावर पूरस्थिती होती तेव्हा महाराष्ट्र, कर्नाटकातील दूध बंद झाल्याने गोवा डेअरीच्या दुधाची विक्री वाढून ७२ हजार लिटरवर पोचली. सध्या ३0 हजार लिटरचा तुटवडा असल्याने ४५ हजार लिटर एवढेच दूध बाजारात येते. कोल्हापूरहून येणारे दूध गाईचे तर बंगळुरूहून येणारे म्हशीचे असते. तेथे पुरामुळे शेतकऱ्यांना विस्थापित व्हावे लागले आहे. पूर ओसरताच शेतकरी आपापल्या गावात परततील तेव्हा पूर्ववत दूध संकलन सुरु होईल, असे सांगण्यात आले.