खतांच्या वाहतुकीत घट झाल्याने कोकण रेल्वेही आर्थिक अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 05:45 PM2019-10-16T17:45:55+5:302019-10-16T17:46:00+5:30
नफ्यात झालेली घट महामंडळासाठी चिंतेचा विषय असून माल वाहतुकीची सध्याची स्थिती पहाता महामंडळाचे उत्पन्न आणखीही खाली जाण्याची शक्यता असल्याचे संजय गुप्ता यांनी सांगितले.
मडगाव: अन्नधान्य व खतांच्या माल वाहतुकीत मोठय़ा प्रमाणावर घट झाल्याने कोकणरेल्वे महामंडळही आर्थिकदृष्टय़ा अडचणीत आले असून मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोकणरेल्वेचा एकूण नफा तब्बल 27 कोटी रुपयांनी खाली उतरला आहे.
कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष संजय गुप्ता यांनी महामंडळाच्या स्थापना दिनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. 2017-18 या आर्थिक वर्षात कोंकण रेल्वेने 129 कोटींचा नफा केला होता. 2018-19 साली हा नफा 102 कोटींवर पोहोचला. यंदाची कोंकण रेल्वेची एकूण उलाढाल 2898 कोटींची झाल्याचे त्यांनी सांगितले.
नफ्यात झालेली घट महामंडळासाठी चिंतेचा विषय असून माल वाहतुकीची सध्याची स्थिती पहाता महामंडळाचे उत्पन्न आणखीही खाली जाण्याची शक्यता असल्याचे संजय गुप्ता यांनी सांगितले. महामंडळाचा महसूल वाढावा यासाठी आम्ही वेगवेगळे उपाय घेत असून खर्चातही कपात करण्यावर आमची भर असल्याचे त्यांनी सांगितले. कोकण रेल्वेचे वाणिज्य विभागाचे संचालक एच. डी. गुजराती यांनी पत्रकारांशी बोलताना, सध्याच्या मंदीची झळ कोंकण रेल्वेलाही बसली असून विषेशत: अन्नधान्य व खतांच्या वाहतुकीत झालेली घट याला कारणीभूत आहे. ही तूट भरुन काढण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत असे त्यांनी सांगितले.