मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज; पावसाळ्यात मार्गावर ६७३ कर्मचारी ठेवणार रात्रंदिवस पहारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 11:48 AM2023-06-07T11:48:58+5:302023-06-07T11:49:39+5:30
मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज झाली असून रेल्वेमार्गावर ६७३ जण पहारा देणारा आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज झाली असून रेल्वेमार्गावर ६७३ जण पहारा देणारा आहेत. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेचे नवे वेळापत्रक दि. १० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार आहेत.
रेल्वेला वेगमर्यादा ही घालून देण्यात आल्या आहेत. रेल्वे मार्गावर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. डोंगरकड्यातून बोगदे तयार केले आहे. पुलांची संख्याही जास्त असल्याने वेगमर्यादा घालून गाड्या चालविल्या जातील. रोहा ते वीर ११० कि.मी प्रतितास, वीर ते कणकवली ७५ कि.मी. प्रतितास, कणकवली ते उडुपी ९० किमी प्रतितास व उडुपी ते ठोकूर ११० किमी प्रतितास वेगाने गाड्या चालतील.
नऊ स्थानकांवर सेल्फ रेकॉडिंग पर्जन्यमापक यंत्रणा माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलेवाडी, कणकवली, मडगाव, कारवार, भटकळ व उडुपी रेल्वेस्थानकात बसविण्यात आली आहे. पूर सूचना देणारी यंत्रणा तसेच चार ठिकाणी अॅनिमोमीटर बसविले गेले आहेत. पाण्याच्या नाल्यांची साफसफाईकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. वॉचमन तैनात केले जाणार आहे.
लोको पायलट व गार्डना वॉकीटॉकी दिली जाईल. रत्नागिरी व वेर्णा येथे ऑपरेशन थिएटर व आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी तरतूद असलेली सेल्फप्रोपेल्ड एरएमव्हीएस आहे. वेर्णा येथे अपघात निवारण रेल्वे सज्ज ठेवली आहे. कोकण रेल्वे वरील प्रत्येक स्थानकावर २५ वॅटचे व्हीएचएफ बेस स्टेशन आहेत. पुलांसाठी पूर सूचना देणारी यंत्रणा तीन ठिकाणी असेल. काली नदी (माणगाव ते वीर), सावित्री नदी (वीर ते सापे वामणे), वशिष्ठ नदी (चिपळूण ते कामथे) ही ती ठिकाणे आहेत.