शणै गोंयबाबमुळेच कोंकणी भाषेचे अस्तित्व: जेष्ठ ज्ञानपिठ पुरस्कार विजेते लेखक दामोदर मावजो
By समीर नाईक | Published: December 16, 2023 01:53 PM2023-12-16T13:53:03+5:302023-12-16T13:54:31+5:30
पणजी: शणै गोंयबाब यांचे जीवन आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. कोंकणी भाषा अस्तित्वासाठी झटत असताना, शणै गोंयबाब यांनी आमच्या कोंकणी भाषेला ...
पणजी: शणै गोंयबाब यांचे जीवन आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. कोंकणी भाषा अस्तित्वासाठी झटत असताना, शणै गोंयबाब यांनी आमच्या कोंकणी भाषेला न्याय मिळवून दिला. दुदैवाने त्यांचे मोठे कर्तृत्व शंभर वर्षे झाली तरी अजूनही गोमंतकीयांकडे पोहचलेले नाही. पण आता आमची जबाबदारी आहे की त्यांचे साहित्य, जीवन लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्य केले पाहीजे. यासाठी शालेय, महाविद्यालयीन स्तरावरुन काम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जेष्ठ ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक दामोदर मावजो यांनी केले.
पणजी बालभवन येथे केंद्रीय साहित्य अकादमी, गोवा कोंकणी अकादमी आणि बालभवन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘शणै गोंयबाब : जीवित आणि बरप’ या विषयावर परिसंवाद कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत आहे. यावेळी त्यांच्यासोबत जेष्ठ लेखक ॲड. उदय भेंब्रे, साहित्यीक डॉ. पुर्णानंद च्यारी, कोंकणी अकादमीचे अध्यक्ष अरुण साखरदांडे, केंद्रीय साहित्य अकादमीचे प्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी ओम प्रकाश नागर, कोंकणी सल्लागार मंडळाचे निमंत्रक मॅलवीन रॉड्रिग्ज, व इतर मान्यवर उपस्थित होते.
शणै गोंयबाब लोकांना कधीच कळलेला नाही. मला आठवते जेव्हा जवाहरलाल नेहरु राज्यात आले होते, तेव्हा त्यांनी विधान केलेले की गोवा के लोग अजीब है. हे त्यांचे विधान अजूनही गाेमंतकीयांबाबत खरे ठरत आहे. गोंयबाब यांनी कोंकणीच्या भाषेसाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांनी गोवा, गोंयकारपण व भाषा हे मिशीन म्हणूनच त्यावेळेस काम केले. त्यांच्यामुळे आज काेंकणी भाषेचे अस्तित्व आहे. आमचा इतिहास पाहता आमच्यावर अनेकांनी राज्य केले, यातून भाषा व संस्कृतीवर मर्यादा आल्या, पण या गोष्टी कधीच नष्ट झाल्या नाही, याचे प्रमुख कारण म्हणजे राज्यात त्या काळात संस्कृती व भाषा जपण्यासाठी वावरणारे शणै गोंयबाब सारखे इतर कार्यकर्ते, असे मावजो यांनी यावेळी सांगितले.
आम्ही कुठल्याही भाषेचा इतिहास पाहिल्यावर लक्षात येते की जेव्हा जेव्हा कूठल्याही भाषेवर अन्याय झाला, त्यावेळीस एका महापुरुषाने पुढाकार घेत भाषा वाचविण्यासाठी प्रयत्न केला. मराठीच्या बाबतीत हे कार्य संत ज्ञानेश्वराने केले, तर कोंकणीसाठी हे कार्य शणै गोंयबाब यांनी केले, यात शंका नाही. आज शणै गोंयबाब यांच्यावर संशोधन करण्याची गरज आहे, कारण त्यांचे जीवन व साहित्य त्या तोडीचे आहे, असेही मावजो यांनी यावेळी सांगितले.