कोंकणी साहित्यिक रमेश वेळुस्कर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 05:03 AM2018-10-22T05:03:57+5:302018-10-22T05:04:03+5:30
साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक रमेश भगवंत वेळुस्कर (७०) यांचे रायबरेली येथे अल्प आजाराने निधन झाले.
पणजी : साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक रमेश भगवंत वेळुस्कर (७०) यांचे रायबरेली येथे अल्प आजाराने निधन झाले. कोंकणी साहित्यातील म्हालगड्यांपैकी एक प्रतिभावान कवी, लेखक, समीक्षक, भाषांतरकार म्हणून ते परिचित होते.
रायबरेली येथे ते पत्नीच्या घरी गेले होते. अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. बंगाली भाषा शिकण्यासाठी ते भुवनेश्वर येथे असताना त्यांची ओळख उत्तर प्रदेशमधील मिथिलेशकुमारी श्रीवास्तव यांच्याशी झाली. त्यानंतर त्यांनी विवाह केला.
३३ वर्षे त्यांनी कोंकणी, मराठी व हिंदी विषयाचे शिक्षक म्हणून काम केले. कविता, कादंबऱ्या, नाटके आदी २५ पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांची ‘तुकारामाची गाथा’ व ‘गितांजली’ ही बंगालीतून कोंकणीत केलेली भाषांतरे तर लोकप्रिय ठरली. त्यांनी शास्त्रीय संगीताची विद्या आत्मसात केली होती. कोंकणी भाषा मंडळ व कला अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळाला होता. ‘साउलगोरी’ या काव्यसंग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला. १९७९ मध्ये त्यांचा ‘मोरपाखां’ हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला होता.