अपहृत मरियमच्या दुर्दैवाचा फेरा सुटेना!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 01:44 PM2018-09-26T13:44:00+5:302018-09-26T13:47:57+5:30
एक वर्षापूर्वी मडगाव रेल्वे स्थानकावरुन अपहृत करण्यात आलेल्या तीन वर्षाच्या मरियमच्या आई-वडिलांचा शेवटी पोलिसांना शोध लागला.
मडगाव - एक वर्षापूर्वी मडगाव रेल्वे स्थानकावरुन अपहृत करण्यात आलेल्या तीन वर्षाच्या मरियमच्या आई-वडिलांचा शेवटी पोलिसांना शोध लागला. मात्र मरियमचे हे पालकच स्वत: अत्यंत हलाखीच्या अवस्थेत जीवन कंठीत असल्यामुळे या मुलीचा ताबा या अशा पालकांकडे द्यावा का असा नवा प्रश्न कोकण रेल्वेपोलिसांसमोर उभा राहिला आहे.
नोव्हेंबर 2017 मध्ये कोकण रेल्वेच्या मडगाव स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नं. 1 वरुन या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. संशयित रिझवान याने या मुलीला भोपाळमध्ये नेऊन तिथे तिला भीक मागण्यास लावले होते. भीक मागताना ती भोपाळ पोलिसांना सापडल्यामुळे मरियमला भोपाळच्या निवारागृहात ठेवण्यात आले होते. दरम्यान, या सप्टेंबर महिन्यात आरोपीचा पत्ता पोलिसांना लागल्यामुळे ती अपहृत मुलगी कुठे आहे याचा थांगपत्ताही पोलिसांना लागला होता. मात्र तोपर्यंत हुबळीत रेल्वे स्टेशनजवळ राहणाऱ्या मरियमच्या पालकांनी आपल्या राहण्याचे ठिकाण बदलल्याने मुलगी मिळाली पण पालक हरवले अशी रेल्वे पोलिसांची स्थिती झाली होती. पालक नसल्यामुळे भोपाळमध्ये असलेल्या मरियमचा ताबा कोकण रेल्वे पोलिसांकडे देण्यास तिथल्या प्रशासनाने नकार दिला होता.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मरियमची आई पुष्पा जलमान व वडील नागेंद्र हे आपल्या दोन मुलांसह मडगाव रेल्वे स्थानकावर दिसल्यावर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र त्यांची चौकशी केली असता, ते स्वत: च अत्यंत हलाखीच्या स्थितीत राहत असल्याचे दिसून आले. त्यामुळे मरियमचा ताबा त्यांच्याकडे दिल्यास ते तिचा व्यवस्थित सांभाळ करु शकतील का हा प्रश्र्न निर्माण झाला आहे. या दाम्पत्याला एकूण तेरा अपत्ये असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणो, मरियमची मोठी बहीण रत्ना ही हुबळीमध्ये एका घरात मोलकरणीचे काम करते. तिच्या आई-वडिलांच्या मानाने या मुलीची स्थिती काहीशी चांगली आहे. त्यामुळे तिच्या ताब्यात मरियमला देता येईल का याची चाचपणी पोलिसांकडून केली जात आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणो, कोकण रेल्वे पोलिसांनी रत्नाला मडगावात येण्यासाठी बोलावा पाठविला आहे. ती मडगावात आल्यानंतरच मरियमचे पुढे काय केले जाईल हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, आपल्या अपहृत मुलीला पाहण्यासाठी तिची आई पुष्पा ही सध्या अस्वस्थ आहे. मात्र त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीने पोलिसांसमोर अधिकच बिकट समस्या निर्माण करुन ठेवली आहे.